Clash over insurance dispute : इन्शुरन्सच्या कारणावरून झालेल्या वादातून एका कुटुंबाला शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी (१७ जुलै) दुपारी आबुबकर मशिदीसमोरील रस्त्यावर घडली.

देऊळगाव राजात वादाचे हिंसक रूप; शिवीगाळ, मारहाण व जीवे मारण्याची धमकी
गजानन तिडके
देऊळगाव राजा : इन्शुरन्सच्या कारणावरून झालेल्या वादातून एका कुटुंबाला शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी (१७ जुलै) दुपारी आबुबकर मशिदीसमोरील रस्त्यावर घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सैयद साबीर सैयद रौफ (वय ३३, व्यवसाय – टायर दुकान, रा. अमृतनगर, देऊळगाव राजा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी शेख रफिक, शेख अतिक शेख रफिक, शेख तौसिफ शेख रफिक आणि शेख जुबेर शेख रफिक, सर्व रा. कबाडपुरा, देऊळगाव राजा यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, १७ जुलै रोजी दुपारी साडेदोनच्या सुमारास आबुबकर मशिदीबाहेरील रस्त्यावर फिर्यादीचे वडील आणि आरोपी यांच्यात इन्शुरन्सच्या कारणावरून वाद सुरू होता. त्यावेळी फिर्यादीने हस्तक्षेप करून, “माझा मोठा भाऊ आल्यानंतर आपण बसून वाद मिटवू,” असे सांगितल्याचा उल्लेख तक्रारीत आहे.
यावेळी आरोपींनी फिर्यादी, त्यांचे वडील आणि भावाला अश्लील शिवीगाळ केल्याचा तसेच चापट-बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. घटनेत फिर्यादी जखमी झाल्याने त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कायमी गुन्हा क्रमांक ३२३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २९६, ११५(२), ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानोबा चमकुरे यांनी फिर्याद नोंदवून घेतली असून, सहाय्यक फौजदार नायबराव मोगल हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

