Clash involving :येथील बसस्थानक परिसरात २ ऑक्टोबर रोजी सकाळी दोन गटांत झालेल्या जोरदार हाणामारीत चौघे गंभीर जखमी झाले. काठ्या आणि लोखंडी रॉडचा वापर करून झालेल्या या मारामारीमुळे बसस्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. जखमींना साखरखेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बुलढाणा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बसस्थानकातील हाणामारीनंतर पोलीस ठाण्यातही धिंगाणा; सात जणांवर गुन्हा
साखरखेर्डा : येथील बसस्थानक परिसरात २ ऑक्टोबर रोजी सकाळी दोन गटांत झालेल्या जोरदार हाणामारीत चौघे गंभीर जखमी झाले. काठ्या आणि लोखंडी रॉडचा वापर करून झालेल्या या मारामारीमुळे बसस्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. जखमींना साखरखेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बुलढाणा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सकाळी सुमारे ९ वाजता बसस्थानक परिसरात दोन गट आमनेसामने आले. त्यांच्यात काठ्या व लोखंडी रॉडने मारामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत विजय हनुमान जैस्वाल, नंदकिशोर हनुमान जैस्वाल, गोपाल भीमराव शिराळे आणि सुरेश सकरू शिराळे हे चौघे गंभीर जखमी झाले.
बसस्थानकावरील हाणामारीनंतर दोन्ही गट तक्रार देण्यासाठी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात गेले. मात्र, पोलीस ठाण्याच्या आवारातही दोन्ही गटांमध्ये पुन्हा वाद झाला. पोलिस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली.
याप्रकरणी पोलीस कर्मचारी संजय भानुदास पेहरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजय जैस्वाल, यश अनिल जैस्वाल, शुभम जैस्वाल, नंदकिशोर जैस्वाल, सुरेश भीमराव शिराळे आणि सुरेश सकरू शिराळे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १९४ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, बसस्थानक परिसरात झालेल्या हाणामारीप्रकरणी बातमी लिहिपर्यंत स्वतंत्र गुन्हा दाखल झालेला नव्हता. जखमींपैकी एका व्यक्तीचा वैद्यकीय तपासणी अहवाल प्राप्त होणे बाकी असल्याने तसेच तक्रार दाखल न झाल्याने या प्रकरणातील पुढील कारवाई प्रलंबित असल्याची माहिती आहे.
वादाची पार्श्वभूमी
साखरखेर्डा येथील विजय जैस्वाल आणि गोपाल शिराळे यांच्यातील व्यवसायाच्या कारणावरून हा वाद निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विजय जैस्वाल आणि त्यांचे बंधू साखरखेर्डा बसस्थानक परिसर तसेच परिसरातील विविध फाट्यांवर अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचा आरोप आहे.
तर गोपाल शिराळे यांनी उदरनिर्वाहाचे साधन म्हणून साखरखेर्डा-शिंदी रोडवरील स्वतःच्या शेतात धाबा सुरू केला आहे. या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांना दारू पुरविली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या व्यवसायावरून दोन्ही गटांत मतभेद निर्माण झाल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, विजय जैस्वाल यांनी गोपाल शिराळे यांच्या धाब्याच्या परिसरात व्यवसाय सुरू करण्यासाठी जागा भाड्याने घेतल्याचे सांगण्यात येत आहे. याला गोपाल शिराळे आणि त्यांचे वडील भीमराव शिराळे यांनी विरोध करून, येथे व्यवसाय करू नये, असे सांगितल्याची माहिती आहे. सुरुवातीला या सूचनेला नकार देण्यात आला आणि त्यानंतरही संबंधित व्यवसाय सुरूच राहिल्याने दोन्ही बाजूंतील वाद अधिक चिघळल्याचे सांगण्यात येते.
या वादाचे पर्यवसान २ ऑक्टोबर रोजी सकाळी बसस्थानक परिसरातील हाणामारीत झाले. दोन गटांमध्ये काठ्या आणि लोखंडी रॉडने मारामारी सुरू झाल्याने बसस्थानकावर आलेल्या प्रवाशांमध्ये, विशेषतः महिला प्रवाशांमध्ये, काही काळ घबराट निर्माण झाली.
महात्मा गांधी जयंतीनिमित्त देशभरात शांततेचा संदेश दिला जात असताना साखरखेर्डा येथे घडलेल्या या प्रकारामुळे शांततेला गालबोट लागल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. बसस्थानकातील हाणामारीनंतर पोलीस ठाण्याच्या आवारातही वाद झाल्याने पोलिसांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बसस्थानकातील मूळ हाणामारीप्रकरणी पुढील तपास आणि वैद्यकीय अहवालानंतर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

