Citizens strongly oppose :मोताळा तालुका अपर जिल्हाधिकारी कार्यालय, खामगावशी संलग्न करण्याच्या संभाव्य निर्णयाविरोधात बुधवारी (दि. २९) मोताळा फाट्यावर नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. सामाजिक कार्यकर्ते लुकमान शाह यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात नागरिक, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

‘मोताळा बुलढाण्याशीच कायम ठेवा’; संभाव्य निर्णयाविरोधात नागरिकांचा एल्गार
मोताळा : मोताळा तालुका अपर जिल्हाधिकारी कार्यालय, खामगावशी संलग्न करण्याच्या संभाव्य निर्णयाविरोधात बुधवारी (दि. २९) मोताळा फाट्यावर नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. सामाजिक कार्यकर्ते लुकमान शाह यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात नागरिक, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंदोलनकर्त्यांनी मोताळा तालुका भौगोलिकदृष्ट्या तसेच दळणवळणाच्या दृष्टीने बुलढाण्याशी अधिक सुसंगत असल्याचे सांगितले. बहुतांश प्रशासकीय कामांसाठी नागरिक बुलढाण्यात येत असल्याने तालुका खामगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी संलग्न केल्यास नागरिक, शेतकरी, कामगार आणि विद्यार्थ्यांना अतिरिक्त अंतराचा प्रवास करावा लागेल. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा अपव्यय होऊन सर्वसामान्यांची गैरसोय वाढेल, असा दावा आंदोलनकर्त्यांनी केला.
मोताळा तालुका पूर्वीप्रमाणेच बुलढाणा अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी संलग्न ठेवावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. प्रशासनाने स्थानिक जनभावनेचा आदर करून कोणताही निर्णय घ्यावा, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
आंदोलनानंतर तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. नागरिकांच्या भावना आणि स्थानिक परिस्थितीचा विचार करून कोणताही निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
या आंदोलनात भीमराव इंगळे, सरदार शाह, हनीफ खान, जितू खराटे, निंबाजी गायकवाड, साबीर शेख, मुन्शीर खान, नसीम खान, असलम खान, सलीम शाह, फारूक शाह, उस्मान शाह, साजिद खान यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते.

