Chhatrapati Shivaji Vidyalaya :प्रधानमंत्री शालेय पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय परसबाग स्पर्धेत मोताळा तालुक्यातील छत्रपती शिवाजी विद्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करीत जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे.

पंडीत सावळे
मासरूळ : प्रधानमंत्री शालेय पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय परसबाग स्पर्धेत मोताळा तालुक्यातील छत्रपती शिवाजी विद्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करीत जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे.
पर्यावरणपूरक सवयी, स्वावलंबी जीवनशैली, श्रमप्रतिष्ठा, कृषी उत्पादन कौशल्य आणि निसर्गसंवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी या उद्देशाने शासनाच्या वतीने मागील वर्षापासून प्रत्येक शाळेत परसबाग स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. या उपक्रमातून शालेय परिसरात भाजीपाला, फळझाडे आणि औषधी वनस्पतींची लागवड करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण दिले जाते.
विशेष म्हणजे, मागील वर्षीही या विद्यालयाने जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळवला होता, तर यंदा पुन्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवत सलग दुसऱ्या वर्षी पुरस्कार पटकावण्याचा मान राखला आहे. खाजगी संस्थांच्या शाळांमधून गुणवत्ता यादीत झळकणारी ‘छत्रपती शिवाजी विद्यालय, सिंदखेड लपाली’ ही जिल्ह्यातील एकमेव शाळा ठरली आहे.
विद्यालयाच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक सर्जेराव देशमुख यांनी सांगितले की, “हे यश संस्थेचे अध्यक्ष तथा भाजप नेते योगेंद्र गोडे यांच्या मार्गदर्शनासह पंचायत समिती मोताळाच्या शालेय पोषण आहार विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नांचे फलित आहे.”
परसबाग उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रमसंस्कार, शेतीविषयक प्राथमिक ज्ञान, सेंद्रिय पद्धतीची ओळख आणि पर्यावरण जपण्याची जाणीव अधिक दृढ होत आहे. विद्यालयाच्या या सलग यशामुळे तालुक्यातील इतर शाळांसाठीही प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.

