Case Registered : विवाहितेला कथितरित्या ‘तलाक-तलाक-तलाक’ म्हणत घराबाहेर काढणे, शिवीगाळ, धमकी तसेच रोकड हिसकावल्याच्या आरोपांवरून देऊळगाव मही पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना इस्लामपुरा परिसरात उघडकीस आली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

विवाहितेच्या तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलिसांची कारवाई; धमकी व रोकड हिसकावल्याचाही आरोप
देऊळगाव राजा : विवाहितेला कथितरित्या ‘तलाक-तलाक-तलाक’ म्हणत घराबाहेर काढणे, शिवीगाळ, धमकी तसेच रोकड हिसकावल्याच्या आरोपांवरून देऊळगाव मही पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना इस्लामपुरा परिसरात उघडकीस आली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
याप्रकरणी 24 वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी शेख कलीम, तारीख शेख (दोघे रा. नादी कॉलनी, जालना) तसेच शेख कलीम शेख इकबाल (रा. संभाजीनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा आरोपी क्रमांक एक याच्याशी सन २०२२ मध्ये विवाह झाला होता. वैवाहिक वाद सुरू असल्याने आरोपीने फिर्यादीस कथितरित्या तीन वेळा ‘तलाक’ उच्चारून घरातून हाकलून दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर फिर्यादी माहेरी राहत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादीनुसार, २९ मे रोजी रात्री सुमारे ११ वाजताच्या सुमारास इस्लामपुरा येथे आरोपींनी फिर्यादी व तिच्या आईला शिवीगाळ केली. तसेच आरोपी क्रमांक दोन याने फिर्यादीच्या अंगावरील ओढणी ओढून अशोभनीय वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपी क्रमांक तीन याने फिर्यादीच्या आईला ओढाताण करून शिवीगाळ केली तसेच तिच्या पर्समधील ३० हजार रुपये हिसकावून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याशिवाय, आरोपींनी फिर्यादी व तिच्या आईला घटनेबाबत कोणाकडे तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कायम गुन्हा क्रमांक २५२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण अधिनियमातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक फौजदार जाधव यांनी गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कलीम देशमुख करीत आहेत.

