Case registered against: उसनवारीच्या पैशांच्या व्यवहारावरून झालेल्या वादातून शिवीगाळ, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पैशांच्या व्यवहारातून वाद विकोपाला; जीवे मारण्याची धमकी
गजानन तिडके
देऊळगाव राजा : उसनवारीच्या पैशांच्या व्यवहारावरून झालेल्या वादातून शिवीगाळ, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महमंद तौफीक महमद रफीक (वय ४६, रा. कबाडपुरा, देऊळगाव राजा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक ३२६/२०२६ हा कलम २९६, ११५(२), ३५१(२), ३५१(३) व ३(५) भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपी सय्यद रौफ, सय्यद जावेद सय्यद रौफ, सय्यद जाकीर सय्यद रौफ व सय्यद शाकीर सय्यद रौफ (सर्व रा. अमूतनगर, देऊळगाव राजा) असल्याचे पोलिसांनी सांगितले.
फिर्यादीनुसार, १७ जुलै रोजी दुपारी सुमारे ३ वाजता फिर्यादी, त्यांचे वडील व इतर साक्षीदार नमाज अदा करून अमेन अजीज मशिदीसमोरील रस्त्याने जात असताना आरोपी तेथे आले. त्यावेळी आरोपी क्रमांक १ याने फिर्यादीच्या वडिलांशी उसनवारीच्या पैशांवरून वाद घालत, “मी तुमचे पैसे देणार नाही, तुमच्याकडून काय होते ते करा,” असे म्हणत कथितरीत्या अश्लील शिवीगाळ केली.
फिर्यादी व त्यांचे भाऊ हा वाद मिटविण्याचा प्रयत्न करीत असताना आरोपी क्रमांक २ ते ४ यांनी फिर्यादी व साक्षीदारांना चापटाबुक्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, पुन्हा पैशांची मागणी केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,ठाणेदार ब्रम्हा गिरी यांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार नायबराव मोगल हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

