Mahabreaking

[breaking_news]

Both handpumps :खेट्रीच्या उर्दू शाळेतील दोन्ही हातपंप सहा महिन्यांपासून बंद; विद्यार्थ्यांची पाण्यासाठी भटकंती

Both handpumps : पातूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या खेट्री येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेतील दोन्ही हातपंप गेल्या सहा महिन्यांपासून बंद असल्याने विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शाळा सुरू झाल्यानंतरही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेतच पाण्यासाठी बाहेर जावे लागत असल्याने त्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याची बाब समोर आली आहे.

Both handpumps

शाळा सुरू, पण पिण्याच्या पाण्याची सोय नाही; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

राहुल सोनोने

दिग्रस बु., : पातूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या खेट्री येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेतील दोन्ही हातपंप गेल्या सहा महिन्यांपासून बंद असल्याने विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शाळा सुरू झाल्यानंतरही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेतच पाण्यासाठी बाहेर जावे लागत असल्याने त्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याची बाब समोर आली आहे.

या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवा सेना (उबाठा शिवसेना) सस्ती सर्कल प्रमुख सय्यद समीर यांनी ३० जून रोजी पातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर करून दोन्ही हातपंप तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, ३० जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून विद्यार्थ्यांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी ही मूलभूत गरज आहे. मात्र हातपंप बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना पाणी आणण्यासाठी शाळेबाहेर जावे लागत आहे. त्यामुळे त्यांचा अभ्यास विस्कळीत होत असून आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

शाळेतील दोन्ही हातपंप बंद असल्याची माहिती संबंधित विभागाला वारंवार देऊनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही, असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. या प्रकारामुळे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांतून व्यक्त होत आहे.

हातपंपांची तातडीने दुरुस्ती न झाल्यास विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांसह पातूर पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सय्यद समीर यांनी दिला आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान झाल्यास त्यास संबंधित प्रशासन जबाबदार राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यासंदर्भात सय्यद समीर म्हणाले, “खेट्री येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दोन हातपंप बसविण्यात आले होते. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून दोन्ही हातपंप बंद आहेत. विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे. अन्यथा विद्यार्थी व पालकांसह पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल.”

विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आणि शिक्षणाशी संबंधित या गंभीर प्रश्नाकडे पंचायत समिती प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन हातपंप दुरुस्त करावेत, अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top