BJP files police complaint: सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्याचा आरोप करत संबंधित व्यक्तीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

सोशल मीडियावरील पोस्टवरून बोरगाव मंजूत भाजप आक्रमक; कठोर कारवाईची मागणी
बोरगाव मंजू : सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्याचा आरोप करत संबंधित व्यक्तीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात भाजपचे सरचिटणीस जयकृष्ण ठोकळ आणि जिल्हा सरचिटणीस सुबोध गवई यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठाणेदारांना निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, एका मोबाईल क्रमांकावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रावर हार दाखवून “श्रद्धांजली” असा मजकूर असलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली. या पोस्टमुळे अनेक नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असून, समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित व्यक्तीविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी चंद्रकांत मांगे, प्रकाश असलमोल, धम्मदीप गवई, अजय निवाने, पंकज शेंडे, रवींद्र ढवळे, सुनील सावलकर, मंगेश खानापुरे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, ठाणेदार सुनील वानखडे यांनी निवेदन स्वीकारून तक्रारीची कायदेशीर चौकशी करून नियमानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

