Bhagar : आषाढी एकादशी आणि उपवासाच्या पार्श्वभूमीवर भगरच्या वाढत्या वापरामुळे अन्न विषबाधेचा धोका टाळण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्रासह बुलढाणा जिल्ह्यात यापूर्वी भगर खाल्ल्याने अन्न विषबाधेच्या घटना घडल्या असल्याने भगर खरेदी, साठवण आणि सेवन करताना आवश्यक काळजी घेणे गरजेचे असल्याचे जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजित मंडाले यांनी सांगितले आहे.

बुरशीग्रस्त भगरमुळे अन्न विषबाधेचा धोका; नियमभंग करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईचा इशारा
बुलढाणा : आषाढी एकादशी आणि उपवासाच्या पार्श्वभूमीवर भगरच्या वाढत्या वापरामुळे अन्न विषबाधेचा धोका टाळण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्रासह बुलढाणा जिल्ह्यात यापूर्वी भगर खाल्ल्याने अन्न विषबाधेच्या घटना घडल्या असल्याने भगर खरेदी, साठवण आणि सेवन करताना आवश्यक काळजी घेणे गरजेचे असल्याचे जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजित मंडाले यांनी सांगितले आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, भगरवर अस्परजिलस (Aspergillus) या बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. विशेषतः दमट वातावरणात ही बुरशी वेगाने वाढते आणि त्यातून फ्युमिगाक्लेविन (Fumigaclavine) सारखी विषारी द्रव्ये तयार होतात. अशी भगर सेवन केल्यास उलट्या, मळमळ, पोटदुखी, जुलाब आणि अन्न विषबाधेसारखे गंभीर त्रास उद्भवू शकतात.
भगर खरेदी आणि साठवताना घ्यावयाची काळजी
आरोग्य विभागाने नागरिकांना शक्यतो ब्रँडेड आणि पॅकबंद भगरच खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पॅकेटवरील उत्पादन दिनांक, अंतिम वापर दिनांक, उत्पादकाचा तपशील आणि परवाना क्रमांक तपासूनच भगर खरेदी करावी. लेबल नसलेली किंवा खुली (सुटी) भगर खरेदी टाळावी.
घरी आणल्यानंतर भगर स्वच्छ निवडून कोरड्या, हवाबंद डब्यात साठवावी. ओलसर ठिकाणी साठवण टाळावी. दीर्घकाळ साठवून ठेवलेली भगर वापरू नये, कारण अशा धान्यावर बुरशी वाढण्याचा धोका अधिक असतो.
भगरच्या पिठाबाबत विशेष सूचना
भगरचे तयार पीठ विकत घेण्याऐवजी आवश्यक तेवढीच भगर दळून वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भगरच्या पिठामध्ये ओलावा शोषण्याची क्षमता जास्त असल्याने त्यावर बुरशी वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे भगरच्या भाकरी किंवा दशम्यांऐवजी खिचडीसारखे ताजे पदार्थ खाणे अधिक सुरक्षित असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
तसेच उपवासादरम्यान भगर आणि शेंगदाणे यांसारख्या प्रथिनयुक्त पदार्थांचे सलग दोन-तीन दिवस जास्त प्रमाणात सेवन केल्यास अॅसिडिटी, मळमळ, उलट्या आणि पचनाचे त्रास होऊ शकतात. त्यामुळे हे पदार्थ मर्यादित प्रमाणात आणि पचनशक्तीनुसारच सेवन करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
विक्रेत्यांनाही सूचना
अन्न व औषध प्रशासनाने भगर विक्रेत्यांनाही नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पॅकबंद भगरचीच विक्री करावी, घाऊक खरेदीची पावती जतन करावी, मुदतबाह्य भगर किंवा भगर पीठ विकू नये तसेच खुली भगर किंवा खुले पीठ विक्रीसाठी ठेवू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात भगर विक्री करणाऱ्या दुकानांची अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी सुरू असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
आषाढी एकादशी आणि उपवासाच्या काळात नागरिकांनी सुरक्षित, दर्जेदार आणि ताजी भगरच वापरावी, तसेच अन्न विषबाधेची लक्षणे आढळल्यास तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

