Dr. Madhukar Devkar : बुलढाणा शहरातील जांभरून रोडवरील देवकर हॉस्पिटलचे प्रमुख तथा ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मधुकर देवकर यांचे रविवारी (दि. २६ जुलै) पहाटे सुमारे अडीच वाजता प्रदीर्घ आजाराने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ५५ वर्षे होते. गेल्या सुमारे दहा महिन्यांपासून ते गंभीर आजाराशी झुंज देत होते. त्यांच्या निधनामुळे बुलढाणा जिल्ह्यासह परिसरातील वैद्यकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

रुग्णसेवेला वाहिलेले आयुष्य संपले; वैद्यकीय क्षेत्रात शोककळा
पंडित सावळे
मासरूळ: बुलढाणा शहरातील जांभरून रोडवरील देवकर हॉस्पिटलचे प्रमुख तथा ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मधुकर देवकर यांचे रविवारी (दि. २६ जुलै) पहाटे सुमारे अडीच वाजता प्रदीर्घ आजाराने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ५५ वर्षे होते. गेल्या सुमारे दहा महिन्यांपासून ते गंभीर आजाराशी झुंज देत होते. त्यांच्या निधनामुळे बुलढाणा जिल्ह्यासह परिसरातील वैद्यकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
मूळचे धामणगाव (धाड), ता. बुलढाणा येथील असलेले डॉ. देवकर यांनी स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून अनेक वर्षे रुग्णसेवा केली. त्यांच्या उपचारपद्धतीतील साधेपणा, रुग्णांप्रती असलेली आत्मीयता आणि सेवाभावी वृत्तीमुळे त्यांनी हजारो रुग्णांचा विश्वास संपादन केला होता.
२६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळच्या मॉर्निंग वॉकनंतर घरी परतल्यानंतर त्यांना अचानक ब्रेन हॅमरेज झाला होता. त्यानंतर त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. यापूर्वी त्यांच्या हृदयावरही शस्त्रक्रिया झाली होती. वैद्यकीय उपचार सुरू असतानाही त्यांची प्रकृती पूर्णपणे सुधारू शकली नाही आणि अखेर रविवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी धामणगाव (धाड) येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी बुलढाणा, जालना आणि छत्रपती संभाजीनगर परिसरातील शेकडो डॉक्टर, विविध क्षेत्रांतील मान्यवर, हजारो नागरिक आणि आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बुलढाणाचे आमदार संजय गायकवाड यांनी श्रद्धांजली अर्पण करताना डॉ. देवकर यांच्या सेवाभावी कार्याचा उल्लेख केला. “माझ्या आयुष्यात अनेक डॉक्टर पाहिले, परंतु डॉ. मधुकर देवकर यांच्यासारखा सेवाभावी डॉक्टर विरळाच. त्यांनी कधीही पैशाचा मोह बाळगला नाही. ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ हे तत्त्व त्यांनी आयुष्यभर आचरणात आणले,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. त्यांच्या भाषणावेळी उपस्थित अनेकांचे डोळे पाणावले.
डॉ. देवकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि तीन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे केवळ एक कुशल स्त्रीरोगतज्ज्ञच नव्हे, तर रुग्णांच्या दुःखात सहभागी होणारा संवेदनशील वैद्यकीय सेवक हरपल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. त्यांच्या जाण्याने बुलढाणा जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्राची मोठी आणि न भरून येणारी पोकळी निर्माण झाल्याची शोकभावना व्यक्त केली जात आहे.

