water supply system: शहरातील नागरिकांना शुद्ध, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नगर परिषदेकडून राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी जलपुरवठा प्रकल्पाला आता नवे बळ मिळाले आहे. हैदराबादहून आलेल्या तज्ज्ञ तांत्रिक पथकाने शहरातील फिल्टर हाऊसची सविस्तर पाहणी करून वॉटर ट्रीटमेंट प्लांटच्या इलेक्ट्रो-मेकॅनिकल कामांचे तसेच अत्याधुनिक वॉटर टेस्टिंग प्रयोगशाळेच्या उभारणीचे तांत्रिक मूल्यांकन केले.

आधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्पाला वेग; बाळापूरमध्ये वॉटर टेस्टिंग लॅब उभारणीची तयारी
बाळापूर : शहरातील नागरिकांना शुद्ध, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नगर परिषदेकडून राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी जलपुरवठा प्रकल्पाला आता नवे बळ मिळाले आहे. हैदराबादहून आलेल्या तज्ज्ञ तांत्रिक पथकाने शहरातील फिल्टर हाऊसची सविस्तर पाहणी करून वॉटर ट्रीटमेंट प्लांटच्या इलेक्ट्रो-मेकॅनिकल कामांचे तसेच अत्याधुनिक वॉटर टेस्टिंग प्रयोगशाळेच्या उभारणीचे तांत्रिक मूल्यांकन केले.

तज्ज्ञांनी प्रकल्पातील विविध कामांची प्रत्यक्ष तपासणी करून कामाच्या गुणवत्तेचा आढावा घेतला. तसेच सुरक्षितता, तांत्रिक बाबी आणि निर्धारित मुदतीत काम पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक आधुनिक, विश्वासार्ह आणि कार्यक्षम होणार असून नागरिकांना दर्जेदार व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे.

पाहणीदरम्यान नगर परिषदेच्या अध्यक्षा यांच्या वडिल जम्मू सेठ, डॉ. मोहम्मद फैय्याज अन्सारी, मोहम्मद अकरम, जलसभापती मोहम्मद सऊद, संबंधित अधिकारी तसेच तज्ज्ञ पथकाचे सदस्य उपस्थित होते.
प्रस्तावित आधुनिक वॉटर टेस्टिंग प्रयोगशाळेमुळे पाण्याची नियमित तपासणी करून त्याच्या गुणवत्तेवर सातत्याने नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. त्यामुळे नागरिकांना अधिक सुरक्षित, शुद्ध आणि विश्वासार्ह पिण्याच्या पाण्याची सेवा उपलब्ध होईल.
दरम्यान, शहरवासीयांनी प्रकल्पाची उर्वरित कामेही तातडीने पूर्ण करून बाळापूरला अत्याधुनिक, सक्षम आणि दीर्घकालीन पाणीपुरवठा व्यवस्था उपलब्ध करून देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

