Balapur Municipal Council : नगर परिषद बाळापूरच्या नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील शिक्षण व्यवस्थेचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार केला असून विद्यार्थ्यांना दर्जेदार, आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. नगर परिषदेच्या या निर्णयामुळे शहराच्या शैक्षणिक क्षेत्राला नवी दिशा मिळण्याची आशा व्यक्त होत आहे.

पाचवी-आठवीचे वर्ग सुरू होणार; नगर परिषदेकडून शिक्षण क्षेत्राला नवी दिशा
ज़ाकिर अहमद शेख
बाळापूर : नगर परिषद बाळापूरच्या नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील शिक्षण व्यवस्थेचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार केला असून विद्यार्थ्यांना दर्जेदार, आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. नगर परिषदेच्या या निर्णयामुळे शहराच्या शैक्षणिक क्षेत्राला नवी दिशा मिळण्याची आशा व्यक्त होत आहे.

नगर परिषदेकडून शाळांच्या इमारती, फर्निचर, स्वच्छतागृहे, क्रीडा साहित्य, क्रीडांगणे, संगणक प्रयोगशाळा आणि ग्रंथालय यांसारख्या मूलभूत सुविधांच्या बळकटीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शिक्षण हक्क अधिनियम २००९ अंतर्गत चौथीनंतर पाचवी आणि सातवीनंतर आठवीचे वर्ग सुरू करण्याची प्रक्रिया गतीने सुरू करण्यात आली आहे.
शहराच्या शैक्षणिक विकासात गेल्या अनेक वर्षांपासून निर्माण झालेला ठप्पपणा दूर करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. नव्या शैक्षणिक सत्रात पाचवीच्या वर्गासाठी सुमारे ३०० विद्यार्थ्यांचे, तर आठवीसाठी जवळपास ७० विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले असून या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची तयारी सुरू आहे.
विशेष म्हणजे नगर परिषदेच्या इतिहासात प्रथमच शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षकांच्या शैक्षणिक पात्रता, अध्यापन पद्धती आणि कार्यक्षमतेचा आढावा घेतला जात आहे. आवश्यकतेनुसार शिक्षकांना मार्गदर्शन व सुधारणा सूचना देण्यात येत असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत.
या प्रयत्नांमुळे पालकांचा कल पुन्हा एकदा सरकारी शाळांकडे वाढताना दिसत आहे. सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळत असून प्रशिक्षित, शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण आणि गुणवंत शिक्षकांकडून अध्यापन केले जात आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी आणि शासकीय शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी नगर परिषद बाळापूरने उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. नागरिक, पालक आणि शिक्षणप्रेमींकडून या उपक्रमाचे स्वागत होत असून शहराच्या शैक्षणिक विकासासाठी हा निर्णय मैलाचा दगड ठरणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

