Old Pension Scheme: १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (ओपीएस) लागू करावी, या मागणीसंदर्भात शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी नियुक्ती दिनांक ग्राह्य धरून संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी ठामपणे मांडली. या मागणीवर शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनी सकारात्मक भूमिका घेत, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबत लवकरच बैठक घेऊन या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

‘नियुक्ती दिनांक ग्राह्य धरून जुनी पेन्शन द्या’; शिक्षक आमदार विक्रम काळेंची शिक्षणमंत्र्यांकडे जोरदार मागणी
अकोला : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (ओपीएस) लागू करावी, या मागणीसंदर्भात शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी नियुक्ती दिनांक ग्राह्य धरून संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी ठामपणे मांडली. या मागणीवर शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनी सकारात्मक भूमिका घेत, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबत लवकरच बैठक घेऊन या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
अकोल्यातील शिक्षक शिष्टमंडळाच्या मागणीची आमदार विक्रम काळेंनी घेतली दखल
अकोला जिल्ह्यात पंचायत राज समितीचा दौरा सुरू असताना शिक्षक शिष्टमंडळाने शिक्षक आमदार विक्रम काळे यांची भेट घेऊन २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शनच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. या मागणीची दखल घेत आमदार विक्रम काळे यांनी मुंबई येथे शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांची भेट घेऊन हा प्रश्न ठामपणे मांडला. यावेळी विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीस शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे, आमदार विक्रम काळे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि आमदार किरण सरना यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
भ्रमणध्वनीवरून शिक्षकांना दिलासा
दरम्यान, अकोला जिल्ह्यात पंचायत राज समितीचा दौरा सुरू असताना शिक्षण संघर्ष संघटनेचे जिल्हा कार्यवाह संजय तायडे गुरुजी, प्रा. विठ्ठल पवार, प्रा. संजय म्हैसने, मधुसूदन ढोरे, प्रा. दिलीप अप्तुरकर आदी शिक्षकांच्या शिष्टमंडळाने आमदार विक्रम काळे यांची भेट घेतली होती.
यावेळी राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्ती प्रक्रिया पूर्ण झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अद्याप जुनी पेन्शन योजनेपासून वंचित का ठेवण्यात येत आहे, असा सवाल शिष्टमंडळाने उपस्थित केला. संबंधित कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळावा, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
या प्रश्नावर आमदार विक्रम काळे यांनीही संबंधित कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ न मिळाल्यास त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे स्पष्ट केले. तसेच न्यायालयीन प्रकरणाचा मुद्दा उपस्थित होत असताना, शासनाने जुनी पेन्शन योजना लागू केल्यास सर्वोच्च न्यायालयातील प्रकरण मागे घेण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
२६ हजार कर्मचाऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर
२००५ पूर्वीच्या नियुक्ती प्रक्रियेशी संबंधित सुमारे २६ हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शनचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. नियुक्ती दिनांक ग्राह्य धरून या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. बैठकीत शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनी उपस्थित सर्व प्रतिनिधींना आपापले म्हणणे मांडण्याची संधी दिली. प्रतिनिधींनी मांडलेले विविध मुद्दे त्यांनी स्वतः नोंदवून घेतले. या प्रश्नावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत लवकरच बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढण्याबाबत चर्चा केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. शिक्षणमंत्र्यांच्या या आश्वासनामुळे २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शनच्या प्रश्नाला पुन्हा एकदा वेग आला असून, आता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीकडे राज्यातील संबंधित कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

