Arrest those : अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांच्या पथकाच्या वाहनाला रेती माफीयाने टिप्परने धडक देऊन प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणी आरोपींना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी टप्याटप्याने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार 24 ऑगस्टपासून देऊळगाव राजा तहसील कार्यालयातील कर्मचारी तसेच मंडळ अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकार्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

24 ऑगस्टपासून कामबंद आंदोलन सुरू; महसूल पथकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गजानन तिडके
देऊळगाव राजा : अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांच्या पथकाच्या वाहनाला रेती माफीयाने टिप्परने धडक देऊन प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणी आरोपींना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी टप्याटप्याने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार 24 ऑगस्टपासून देऊळगाव राजा तहसील कार्यालयातील कर्मचारी तसेच मंडळ अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकार्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
महसूल कर्मचारी संघटनेच्या निवेदनानुसार, ग्राम महसूल अधिकारी आकाश खरात, शिपाई पंजाबराव ताठे आणि शासकीय वाहनचालक संतोष भोपळे हे तहसीलदारांच्या सूचनेनुसार सकाळी सुमारे सात वाजता अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात कारवाईसाठी अंढेरा परिसरात गस्तीवर होते. यावेळी देऊळगावमहीकडून पांढऱ्या रंगाचा टिप्पर वाळूची वाहतूक करताना आढळला. पथकाने वाहन थांबवून तपासणी केली असता त्यात सुमारे चार ब्रास वाळू आढळून आली. चालकाकडे वाहतूक परवाना नसल्याचे त्याने सांगितल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
चौकशीदरम्यान सदर टिप्पर हर्षल मनोहर अंभोरे, रा. एकलारा, ता. चिखली यांच्या मालकीचा असल्याचे चालकाने सांगितले. त्यानंतर लाल रंगाच्या ब्रिझा वाहनातून संबंधित व्यक्ती घटनास्थळी आली. त्यांनी स्वतःचे नाव हर्षल मनोहर अंभोरे सांगून टिप्पर आपल्या मालकीचा असल्याचे सांगितल्याचे निवेदनात नमूद आहे. पथकाने टिप्पर पोलीस ठाण्यात नेण्यास सांगितल्यानंतर चालकाला वाहन घेऊन जाण्यास प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
निवेदनानुसार, पथकाने टिप्परचा पाठलाग केला असता लाल रंगाच्या ब्रिझा वाहनातून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर टिप्पर चालकाने पथकाच्या वाहनाला उजव्या बाजूने धडक देत वाहन पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे महसूल कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून शासकीय कर्तव्य बजावताना कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे संघटनेने म्हटले आहे.
या प्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात तहसीलदारांनी रीतसर गुन्हा दाखल केल्याचे निवेदनात नमूद आहे. घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस विभागाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
कारवाई न झाल्यास आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा
महसूल कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेली भीती आणि मानसिक तणाव लक्षात घेता आरोपींवर कारवाई होऊन कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरणाची हमी मिळेपर्यंत वाळूविषयक कर्तव्य बजावणे कठीण असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. आरोपींना तातडीने अटक न झाल्यास आंदोलनाचे टप्पे जाहीर करण्यात आले आहेत.
पहिल्या टप्प्यात २० ऑगस्ट रोजी महसूल कर्मचारी काळ्या फिती लावून घटनेचा निषेध केला. त्यानंतर २१ ऑगस्ट रोजी तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तरीही आरोपीला अटक न झाल्याने अखेर कर्मचार्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मागण्या मान्य होइपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा महसूल कर्मचार्यांनी दिला आहे. महसूल कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवानंद आंधळे, उपाध्यक्ष डी. एस. गोरे आणि सचिव चंद्रकांत इंगळे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

