Alleged Negligence :पिंप्री खोद्री शिवारातील शेत मोजणी प्रकरणात भूमी अभिलेख कार्यालयाकडून वारंवार त्रुटीपूर्ण अभिलेख देण्यात आल्याचा आरोप करत ज्ञानदेव ओंकार नळकांडे या शेतकऱ्याने उपोषणासह देहत्याग आंदोलनाचा इशारा दिला आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांना निवेदन सादर करण्यात आले असून २८ मे २०२६ पासून टप्प्याटप्प्याने आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

जळगाव (जामोद) : पिंप्री खोद्री शिवारातील शेत मोजणी प्रकरणात भूमी अभिलेख कार्यालयाकडून वारंवार त्रुटीपूर्ण अभिलेख देण्यात आल्याचा आरोप करत ज्ञानदेव ओंकार नळकांडे या शेतकऱ्याने उपोषणासह देहत्याग आंदोलनाचा इशारा दिला आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांना निवेदन सादर करण्यात आले असून २८ मे २०२६ पासून टप्प्याटप्प्याने आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्री खोद्री शिवारातील सर्वे क्रमांक १८ व २० मधील गट क्रमांक ३६ च्या शेताची हद्द कायम करून देण्यासाठी संबंधित शेतकऱ्याने दि. ६ जून २०२३ रोजी भूमी अभिलेख कार्यालय, जळगाव जामोद येथे मोजणीसाठी अर्ज केला होता. त्यानुसार दि. २२ डिसेंबर २०२३ रोजी शेताची मोजणी करण्यात आली; मात्र ती अर्धवट व त्रुटीपूर्ण असल्याचा दावा शेतकऱ्याने केला आहे. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर ‘क प्रत’ उपलब्ध झाली; परंतु त्यामध्ये एका बाजूच्या मोजमापाची माहितीच नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यानंतर तक्रारीनंतर पुन्हा मोजणी करण्यात आली व दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी सुधारित ‘क प्रत’ देण्यात आली. मात्र, या सुधारित प्रतीतही शेताचा आकार, क्षेत्रफळातील तफावत, हद्दीच्या खुणा व बांधाच्या जागेसंदर्भात तब्बल आठ त्रुटी असल्याचा दावा शेतकऱ्याने निवेदनात केला आहे. त्यामुळे अभिलेख मूळ नोंदीशी सुसंगत नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे. शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार, गेल्या तीन वर्षांपासून लेखी तक्रारी करूनही योग्य न्याय मिळाला नाही. माहिती अधिकारातून प्राप्त कागदपत्रांतून प्रकरण चुकीच्या पद्धतीने निकाली काढल्याचे समोर आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याने २८ मे रोजी लाक्षणिक उपोषण, २९ मे रोजी अन्नत्याग, ३० मे रोजी जलत्याग आणि ३१ मे रोजी देहत्याग आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांबाबत संबंधित भूमी अभिलेख कार्यालयाची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही.

