E-Class land scam : साखरखेर्डा येथील गट क्रमांक ८७० मधील ई-क्लास (वर्ग-दोन) जमिनीच्या फेरफार नोंदी, मोजणी अहवालातील कथित अनियमितता आणि महसूल विभागाच्या भूमिकेवर गंभीर आरोप करत युवकांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी व कारवाईची मागणी केली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम १५५ अंतर्गत संबंधित महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

गट क्रमांक ८७० प्रकरण तापले; फेरफार नोंदी व बनावट मोजणी अहवालाच्या चौकशीची मागणी
साखरखेर्डा : साखरखेर्डा येथील गट क्रमांक ८७० मधील ई-क्लास (वर्ग-दोन) जमिनीच्या फेरफार नोंदी, मोजणी अहवालातील कथित अनियमितता आणि महसूल विभागाच्या भूमिकेवर गंभीर आरोप करत युवकांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी व कारवाईची मागणी केली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम १५५ अंतर्गत संबंधित महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, गट क्रमांक ८७० मधील ई-क्लास जमीन पूर्वी पाच भूमिहीन शेतमजुरांना उपजीविकेसाठी प्रत्येकी १ हेक्टर ६० आर क्षेत्र कसण्यासाठी देण्यात आली होती. तसेच याच गटातील १ हेक्टर ६२ आर जमीन साखरखेर्डा एज्युकेशन सोसायटीला क्रीडांगणासाठी भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. मात्र, संबंधित ई-क्लास जमीन वर्ग-दोनवरून वर्ग-एकमध्ये रूपांतरित करून ती खासगी व्यक्तींच्या नावावर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
युवकांचा आरोप आहे की, सुमारे ८ हेक्टर क्षेत्रात अशा प्रकारचे व्यवहार झाले असून काही ठिकाणी भूखंड पाडून विक्री करण्याचाही प्रयत्न सुरू आहे. या प्रक्रियेत महसूल विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संबंधितांना सहकार्य केल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
दरम्यान, एसईएस हायस्कूलच्या क्रीडांगणाच्या जमिनीवर काही व्यक्तींनी ताबा मिळविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ही बाब निदर्शनास येताच गावातील शेकडो युवक घटनास्थळी जमा झाले. त्यानंतर उपविभागीय अधिकारी संजय खडसे, तहसीलदार अजित दिवटे आणि ठाणेदार युवराज रबडे यांना माहिती देण्यात आली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने जमीन पूर्वस्थितीत करण्याचे आदेश दिल्याचा दावा करण्यात आला आहे.
याशिवाय, गट क्रमांक ८७० तसेच अन्य गटांच्या मोजणीप्रकरणी सिंदखेडराजा भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष मोजणी पूर्ण न करता कार्यालयात बसून मोजणी अहवाल तयार केल्याचा आरोप संदीप मगर आणि विशाल गवई यांनी केला आहे. संबंधित मोजणी अहवालावर ज्यांच्या सह्या असल्याचे दाखविण्यात आले आहे, त्यांनी या अहवालाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे सांगितल्याचा दावाही करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकारी, कर्मचारी व संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी युवासेना तालुकाप्रमुख संदीप मगर, बहुजन आघाडीचे जिल्हा सरचिटणीस विशाल गवई, श्याम खरात यांच्यासह शेकडो युवकांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महसूल मंत्र्यांकडे केली आहे.
दरम्यान, रविवारी माजी महसूल राज्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी संबंधित क्रीडांगणाची पाहणी केली. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते रविंद्र पाटील, माजी उपसरपंच सय्यद रफीक यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

