Allegation of a deceptive loan waiver : महाराष्ट्र शासनाने २ जून रोजी जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत अनेक जाचक अटी व शर्ती घालून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत बुलढाणा जिल्हा काँग्रेसच्या वतीने शासन निर्णयाची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला.

जाचक अटी रद्द करा, सरसकट कर्जमाफी द्या; काँग्रेसचे आंदोलन
गजानन तिडके
देऊळगाव राजा : महाराष्ट्र शासनाने २ जून रोजी जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत अनेक जाचक अटी व शर्ती घालून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत बुलढाणा जिल्हा काँग्रेसच्या वतीने शासन निर्णयाची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला.
जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली १६ जून रोजी सिंदखेडराजा येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी कर्जमाफीच्या शासन निर्णयाची होळी करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन संबंधित शासन निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत अनेक अटी व शर्तींचा समावेश केल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी लाभापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे विद्यमान शासन निर्णय रद्द करून जाचक अटी हटवाव्यात आणि राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणारा नवीन शासन निर्णय जारी करावा.
आंदोलनात प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रामविजय बुरुंगळे, जिल्हा सरचिटणीस तथा सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी रमेशदादा कायंदे, सिंदखेडराजा तालुकाध्यक्ष सुनील जायभाये, शहराध्यक्ष कदीर कुरेशी, देऊळगाव राजा तालुकाध्यक्ष रामदास डोईफोडे, शहराध्यक्ष अतिश कासारे, अनिल सावजी, हनीफ शाह, शौकतभाई, रवी इंगळे, नामदेव राठोड, दिलीप गाडेकर, सदानंद वाघमारे, विलास जाधव, सत्यजित खरात, प्रकाश राजे जाधव, भीमराव काकडे, सुभाष कोकाटे, तुषार खरे, शिवराज पाटील, माधव काळुशे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

