sports camps :शालेय पुस्तकी ज्ञानासोबत विद्यार्थ्यांना विविध खेळांचे प्रशिक्षण देऊन सक्षम, सुदृढ आणि संस्कारित पिढी घडविण्याचे कार्य क्रीडा क्षेत्रातून होत असते. विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुणवत्तेला वाव देण्यासाठी अशा शिबिरांची महत्त्वपूर्ण भूमिका असते, असे प्रतिपादन अमरावती विभागीय क्रिडा उपसंचालक गणेशराव जाधव यांनी केले.

जय बजरंग व्यायाम शाळेचे कार्य राष्ट्रीय हिताचे; ग्रामीण भागातील खेळाडू घडविण्याचा स्तुत्य उपक्रम
संजय तायडे
बोरगाव मंजू : शालेय पुस्तकी ज्ञानासोबत विद्यार्थ्यांना विविध खेळांचे प्रशिक्षण देऊन सक्षम, सुदृढ आणि संस्कारित पिढी घडविण्याचे कार्य क्रीडा क्षेत्रातून होत असते. विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुणवत्तेला वाव देण्यासाठी अशा शिबिरांची महत्त्वपूर्ण भूमिका असते, असे प्रतिपादन अमरावती विभागीय क्रिडा उपसंचालक गणेशराव जाधव यांनी केले.
जय बजरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जय बजरंग व्यायाम शाळा केंद्र कुंभारी आणि जिल्हा क्रीडा कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहा दिवसीय ग्रीष्मकालीन निवासी शिबिरात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रीडा उपसंचालक गणेशराव जाधव होते. यावेळी संस्थेचे संचालक प्रकाशभाऊ बिडकर, जय बजरंग व्यायाम शाळेचे जिल्हाप्रमुख गजाननराव म्हैसने, प्रमुख उपस्थिती
मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न भाऊ बिडकर, वासुदेवराव बिडकर,वासुदेवराव आगळे, चंद्रभानजी अतकरे आदी मान्यवर उपस्थित होते. अमरावती विभागीय क्रीडा उपसंचालक गणेशराव जाधव यांनी स्वतःह ग्रीष्म कालीन शिबिरात कवायत मैदानावर घेऊन बँड हाती घेऊ आपल्यातील खेळाडू म्हणून ओळख निर्माण केली.
यावेळी मान्यवरांनी स्व. क्रीडामहर्षी तुकारामभाऊ बिडकर यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ग्रामीण भागातील युवक-युवतींना एकत्रित करून त्यांच्यामध्ये शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त आणि राष्ट्रीय भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी व्यायाम शाळेची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले आहे.
स्व. तुकारामभाऊ बिडकर यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत संचालक प्रकाशभाऊ बिडकर यांच्या पुढाकारातून या दहा दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात धनुर्विद्या, नेटबॉल, थ्रोबॉल, योगासने, लेझीम, मल्लखांब, लाठी-काठी, संस्कार प्रबोधन, स्वयंशिस्त आदी विषयांचे प्रशिक्षण दिले जात आहे.
नामवंत प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना क्रीडा प्रशिक्षणासोबतच ज्ञान, कला आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे दिले जात आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधून राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याचे कार्य ग्रीष्म कालीन शिबिराच्या माध्यमातून सातत्याने सुरू असून या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक व मार्गदर्शक प्रकाशभाऊ बिडकर यांच्यासह जय बजरंग व्यायाम शाळेचे प्रशिक्षक, प्राचार्य, प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहयोग देत आहेत

