Mahabreaking

[breaking_news]

Akola-Mehkar bus: अकोला-मेहकर बसचे टायर पंक्चर; ४० प्रवासी दोन तास रस्त्यावर ताटकळले!

Akola-Mehkar bus: अकोला-मेहकर मार्गावर धावणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे टायर पंक्चर झाल्याने सुमारे ४० प्रवाशांना दोन तास ताटकळत बसावे लागल्याची घटना सोमवारी, २६ ऑक्टोबर रोजी रात्री घडली. आधीच निर्धारित वेळेपेक्षा एक तास उशिराने सुटलेली बस रस्त्यातच बंद पडल्याने विद्यार्थी, विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक आणि इतर प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या घटनेमुळे अकोला-मेहकर मार्गावरील बससेवेच्या दर्जाबाबत तसेच प्रवाशांच्या सुविधांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

Akola-Mehkar bus

  बसला जॅक अन् आवश्यक साहित्यही नाही? अकोला-मेहकर मार्गावरील प्रवाशांचे हाल

राहुल सोनोने

वाडेगाव : अकोला-मेहकर मार्गावर धावणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे टायर पंक्चर झाल्याने सुमारे ४० प्रवाशांना दोन तास ताटकळत बसावे लागल्याची घटना सोमवारी, २६ ऑक्टोबर रोजी रात्री घडली. आधीच निर्धारित वेळेपेक्षा एक तास उशिराने सुटलेली बस रस्त्यातच बंद पडल्याने विद्यार्थी, विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक आणि इतर प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या घटनेमुळे अकोला-मेहकर मार्गावरील बससेवेच्या दर्जाबाबत तसेच प्रवाशांच्या सुविधांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला आगार क्रमांक २ मधून सायंकाळी ५.४५ वाजता सुटणारी अकोला-मेहकर बस (क्रमांक एमएच ४० वाय ५७९१) सोमवारी सायंकाळी ६.४५ वाजता सुटली. ही बस दिग्रस बु. बसस्थानकाजवळ पोहोचली असता रात्री साडेसातच्या सुमारास तिचे टायर पंक्चर झाले. त्यामुळे बसमधील सुमारे ४० प्रवाशांचा पुढील प्रवास खोळंबला.

जॅक आणि आवश्यक साहित्य नसल्याने अडचण

बसचे टायर पंक्चर झाल्यानंतर ते बदलण्यासाठी आवश्यक असलेले जॅक आणि इतर साहित्य बसमध्ये उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. संबंधित विभागाकडून दुसरी गाडी बोलाविल्यास ती पोहोचण्यासाठी एक ते दीड तास लागणार असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे प्रवाशांना बराच वेळ रस्त्यावरच थांबावे लागले.

या बसमध्ये दिग्रस बु. येथून मळसूर, पारखेड, वरांडा, बोथा, मांडवा, उमरा, पांगरा, चान्नी, मेहकर, देऊळगाव, साकरशा, नायगाव आणि दत्तपूर आदी गावांकडे जाणारे प्रवासी होते. रात्रीच्या वेळी बस बंद पडल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय झाली. काही प्रवासी सावरगावकडे जाणाऱ्या बसने पुढे गेले, तर काहींनी खासगी वाहनांचा आधार घेत आपापल्या घराकडे जाण्याचा मार्ग शोधला.

स्थानिक युवकांची मदत; प्रवाशांकडून मोबदला

बसचे टायर बदलण्यासाठी स्थानिक तांत्रिक कामगार अण्णा गवई आणि सोनू आठवले यांना बोलावण्यात आले. त्यांना अनंता ताले, विशाल ताले, दीप ताले आणि राहुल सोनोने यांनी सहकार्य केले. त्यांच्या मदतीने बसचे पंक्चर काढून टायर बदलण्याचे काम करण्यात आले.

या कामासाठी मदत करणाऱ्या युवकांना बसचे चालक-वाहक तसेच बसमधील प्रवासी अॅड. रामप्रसाद डवले आणि जनार्दन राठोड यांनी मोबदला दिल्याची माहिती मिळाली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील बस दुरुस्तीसाठी स्थानिक युवकांची मदत घ्यावी लागल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.

जुन्या बसेसऐवजी चांगल्या गाड्या देण्याची मागणी

अकोला-मेहकर मार्गावर पूर्वी नवीन बसेस चालविण्यात येत होत्या. मात्र, या मार्गावरील रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या फांद्या आणि झुडपांमुळे बसेसचे नुकसान होत असल्याचे कारण देत आता या मार्गावर जुन्या बसेस पाठविल्या जात असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.

अकोला ते मेहकर हे सुमारे १०० किलोमीटरचे अंतर पार करताना प्रवाशांना वारंवार अशा अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार आहे. बस वेळेवर सुटत नसणे, प्रवासादरम्यान तांत्रिक बिघाड होणे आणि आवश्यक दुरुस्ती साहित्य उपलब्ध नसणे यामुळे प्रवाशांच्या अडचणी वाढत आहेत.

अकोला-मेहकर मार्गावर सुस्थितीतील बसेस उपलब्ध करून द्याव्यात, बसमध्ये आवश्यक दुरुस्ती साहित्य ठेवावे आणि बससेवा वेळापत्रकानुसार चालवावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराची दखल घेऊन प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, सुखकर आणि वेळेत होण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top