Mahabreaking

[breaking_news]

Truck overturns: पातूर-बाळापूर मार्गावर चान्नी फाट्यानजीक ट्रक खड्ड्यात पलटी; सुरक्षा उपायांचा अभाव उघड

Truck overturns: बाळापूर-पातूर मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असताना रस्त्याच्या कडेला खोदलेल्या खड्ड्यांजवळ सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. चान्नी फाट्यानजीक बुलढाणा अर्बन वेअरहाऊससमोर सोमवारी, २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास टाइल्स घेऊन जाणारा मालवाहू ट्रक रस्त्यालगतच्या खड्ड्यात पलटी झाला. या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असून चालक व वाहक किरकोळ जखमी झाले. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही.

Truck overturns

  रस्त्याचे काम सुरू, पण सुरक्षेचा पत्ता नाही! चान्नी फाट्याजवळ भीषण अपघात

राहुल सोनोने

वाडेगाव : बाळापूर-पातूर मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असताना रस्त्याच्या कडेला खोदलेल्या खड्ड्यांजवळ सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. चान्नी फाट्यानजीक बुलढाणा अर्बन वेअरहाऊससमोर सोमवारी, २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास टाइल्स घेऊन जाणारा मालवाहू ट्रक रस्त्यालगतच्या खड्ड्यात पलटी झाला. या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असून चालक व वाहक किरकोळ जखमी झाले. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही.

बाळापूर ते पातूर या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी काम सुरू आहे. काँक्रिटीकरणासाठी रस्त्याच्या एका बाजूला सुमारे तीन फूट खोल चर खोदण्यात आला आहे. मात्र, या ठिकाणी वाहनचालकांना सावध करणारे दिशादर्शक फलक, ‘वाहने हळू चालवा’ अशा सूचना देणारे फलक, बॅरिकेड्स किंवा रिफ्लेक्टर लावण्यात आले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी तसेच समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रखर प्रकाशझोतात रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यांचा अंदाज येणे कठीण होत आहे.

सोमवारी सायंकाळी बाळापूरकडून पातूरच्या दिशेने टाइल्स घेऊन जाणारा ट्रक (क्रमांक जीजे ३६ एक्स ३३८८) चान्नी फाट्याजवळ आला असता, समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रखर प्रकाशामुळे चालकाला रस्त्याच्या कडेला खोदलेल्या खड्ड्याचा अंदाज आला नाही. परिणामी, ट्रक थेट खड्ड्यात जाऊन पलटी झाला. या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले, तर चालक व वाहक किरकोळ जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच वाडेगाव पोलीस चौकीचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक विनोद खाडे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. तसेच जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी

रस्त्याचे काम सुरू असताना वाहनचालकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. मात्र, रस्त्याच्या कडेला खोल चर खोदूनही तेथे पुरेशा सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात येत नसल्याने वाहनचालकांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे. चान्नी फाट्यानजीक घडलेल्या या अपघातामुळे रस्त्याच्या कामातील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

संबंधित कंत्राटदार आणि विभागाने तातडीने खड्ड्यांच्या ठिकाणी बॅरिकेड्स, रिफ्लेक्टर, दिशादर्शक फलक तसेच रात्री स्पष्ट दिसतील अशा सूचना लावाव्यात. भविष्यात अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे. वेळीच सुरक्षा उपाययोजना केल्या नाहीत, तर अशा निष्काळजीपणामुळे मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top