Administration wakes up : बाळापूर तालुक्यातील दुर्गम बल्हाडी गावातील नागरी समस्यांमुळे ग्रामस्थांनी मतदान बहिष्काराचा इशारा दिल्यानंतर प्रशासन अखेर जागे झाले आहे. गावातील समस्यांबाबत वृत्त प्रसिद्ध होताच बाळापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी गावाला भेट देत नागरिकांशी संवाद साधला आणि प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

बल्हाडीतील नागरी समस्यांची दखल; गटविकास अधिकाऱ्यांचे तातडीने कामे पूर्ण करण्याचे आश्वासन
राहुल सोनोने
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील दुर्गम बल्हाडी गावातील नागरी समस्यांमुळे ग्रामस्थांनी मतदान बहिष्काराचा इशारा दिल्यानंतर प्रशासन अखेर जागे झाले आहे. गावातील समस्यांबाबत वृत्त प्रसिद्ध होताच बाळापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी गावाला भेट देत नागरिकांशी संवाद साधला आणि प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
चिंचोली गणू गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बल्हाडी गावात अनेक वर्षांपासून मूलभूत नागरी सुविधांचा अभाव असल्याचे चित्र आहे. पिण्याचे पाणी, आरोग्य, रस्ते व इतर आवश्यक सुविधांअभावी ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने गावात तीव्र नाराजी निर्माण झाली होती.
ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या समस्यांवर आधारित वृत्त सलग दोन दिवस प्रसिद्ध झाल्यानंतर पंचायत समिती प्रशासनाने तत्काळ दखल घेतली. त्यानुसार गटविकास अधिकारी नाना पझई, विस्तार अधिकारी (पंचायत) दिग्विजय चव्हाण, पाणीपुरवठा विभागाच्या भिरड मॅडम, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत अमानकर, ग्रामसेवक सुनील इंगळे, सरपंच वनमाला वाघ, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आदींनी बल्हाडी गावात प्रत्यक्ष भेट दिली.
अधिकाऱ्यांनी गावातील परिस्थितीची पाहणी करून नागरिकांसोबत सविस्तर चर्चा केली. गावातील विविध समस्या तातडीने निकाली काढण्यासाठी पंचायत समिती स्तरावर उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. यावेळी विस्तार अधिकारी दिग्विजय चव्हाण यांनी सांगितले की, “बल्हाडी गावातील समस्या प्रत्यक्ष पाहणी करून जाणून घेण्यात आल्या आहेत. नागरिकांशी चर्चा करण्यात आली असून पंचायत समिती स्तरावरून आवश्यक ती कार्यवाही करून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येईल.” दरम्यान, प्रशासनाच्या या भेटीनंतर ग्रामस्थांमध्ये काही प्रमाणात समाधान व्यक्त करण्यात येत असले तरी प्रत्यक्ष कामे कधी पूर्ण होणार, याकडे आता गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

