Operation Prahar : ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत सिटी कोतवाली पोलिसांनी अवैधरित्या गांजा बाळगून त्याची विक्री करणाऱ्या एका आरोपीला अटक केली. आरोपीकडून ५२७ ग्रॅम गांजा, अंदाजे १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जनता भाजी बाजार परिसरात छापा; १० हजारांचा गांजा जप्त, एकावर एनडीपीएस अंतर्गत गुन्हा
अकोला : ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत सिटी कोतवाली पोलिसांनी अवैधरित्या गांजा बाळगून त्याची विक्री करणाऱ्या एका आरोपीला अटक केली. आरोपीकडून ५२७ ग्रॅम गांजा, अंदाजे १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जुलै रोजी सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार जनता भाजी बाजार परिसरातील शासकीय शौचालयाजवळ छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान सुरज सुरेंद्र गुप्ता (वय ३८, रा. सिंधी कॅम्प, ढोर बाजारजवळ, अकोला) हा अवैधरित्या गांजा बाळगून त्याची विक्री करताना रंगेहात आढळून आला.
झडतीदरम्यान आरोपीच्या ताब्यातून ५२७ ग्रॅम गांजा, अंदाजे १० हजार रुपये किमतीचा जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध अपराध क्रमांक २६२/२०२६ नोंदवून कलम ८(क), २०(ब)(२)(अ) एनडीपीएस कायदा तसेच कलम ३(५) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सिटी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय गवई, पोलीस उपनिरीक्षक अनिल इंगोले तसेच डी.बी. पथकातील पोलीस हवालदार अजय भटकर, ख्वाजा शेख, किशोर येवले आणि पोलीस कॉन्स्टेबल शैलेश घुगे व अमोल गायकवाड यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

