murder case arrested :राहुल कालू सारसर यांच्या खूनप्रकरणातील दोन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात रामदासपेठ पोलिसांना अखेर यश आले आहे. धामणगाव रेल्वे (जि. अमरावती) येथून आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून न्यायालयाने त्याला १८ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दोन महिन्यांपासून फरार असलेला खूनप्रकरणातील आरोपी धामणगाव रेल्वेतून जेरबंद
अकोला : राहुल कालू सारसर यांच्या खूनप्रकरणातील दोन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात रामदासपेठ पोलिसांना अखेर यश आले आहे. धामणगाव रेल्वे (जि. अमरावती) येथून आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून न्यायालयाने त्याला १८ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजता अकोला शहरातील अलंकार मार्केट परिसरातील राजमंदिर बारच्या गल्लीत राहुल कालू सारसर (रा. विजय नगर, अकोला) यांची जुन्या वादातून कट रचून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी फिर्यादी राज चंदू सारसर यांच्या तक्रारीवरून रामदासपेठ पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ३७८/२०२६ नोंदविण्यात आला. या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या कलम १८९(२), १९०, १९१(२), १९१(३), ६१(२), १०३(२) आणि ३५१(२)(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यातील आरोपी संतोष पारोचे, बादशाहा पारोचे, हर्ष करोशिया आणि गौरव करोशिया यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र, बलवीर ऊर्फ बल्लू विजय पारोचे हा घटनेनंतर फरार होता.
पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली रामदासपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिरीष खंडारे यांनी विशेष तपास पथकाला फरार आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. पोलीस हवालदार श्याम मोहळे, दादाराव टापरे, अभिजित इंगळे आणि प्रेम नांदोकार यांनी गुप्त माहितीच्या आधारे आरोपी धामणगाव रेल्वे (जि. अमरावती) येथे लपून बसल्याची माहिती मिळवली. त्यानुसार सापळा रचून आरोपीचा पाठलाग करण्यात आला आणि त्याला शिताफीने अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १८ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी (पीसीआर) मंजूर केली. प्रकरणाचा पुढील तपास रामदासपेठ पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. पी. रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत रामदासपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिरीष खंडारे, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत शिंदे, पोलीस उपनिरीक्षक निलेश गायकवाड, संदीप बालोद, पोलीस हवालदार श्याम मोहळे, दादाराव टापरे, किरण गवई, पोलीस कॉन्स्टेबल अभिजित इंगळे, प्रेम नांदोकार, अनिल धनभर, इमाम चौधरी तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल माधुरी लाहोळे यांनी सहभाग घेतला.

