Mahabreaking

[breaking_news]

Minor Girl Sentenced :अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून मारहाण करणाऱ्या आरोपीस पाच महिने कारावास

Minor Girl Sentenced : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्या घरात घुसून मारहाण करणाऱ्या आरोपीस अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने ५ महिन्यांच्या कारावासासह २,५०० रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

Accused who Stalked and Assaulted

पातूर: अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्या घरात घुसून मारहाण करणाऱ्या आरोपीस अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने ५ महिन्यांच्या कारावासासह २,५०० रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आगीखेड येथे ६ सप्टेंबर २०१८ रोजी फिर्यादी महिलेने आपल्या अल्पवयीन मुलीवर घडलेल्या प्रकाराची तक्रार दाखल केली होती. आरोपी शुभम विठ्ठल अरखराव (वय २८, रा. आगीखेड, ता. पातूर, जि. अकोला) हा पीडितेचा सतत पाठलाग करत तिच्याकडे वाईट नजरेने पाहून त्रास देत होता.

दरम्यान, ५ सप्टेंबर २०१८ रोजी पीडिता घरी एकटी असताना आरोपीने घरात घुसून तिला लग्नासाठी जबरदस्ती केली. “माझ्याशी लग्न केले नाही तर मी आत्महत्या करीन,” अशी धमकी देत तिच्या गालावर थप्पड मारली. या घटनेनंतर पीडितेच्या आईने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पातूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३५४(अ), ३२३, ४५२, ५०६ तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ८ व १२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विजय महाले यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते.

या खटल्यात न्यायालयाने फिर्यादी, पीडिता व इतर साक्षीदारांसह एकूण पाच साक्षींची तपासणी केली. उपलब्ध पुरावे व साक्षी ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश-०१, अकोला यांनी आरोपीस भादंवि कलम ४५२ अंतर्गत दोषी ठरवत ५ महिने कारावास व २,५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास १५ दिवसांचा साधा कारावास भोगावा लागणार आहे. तसेच, भादंवि कलम ३२३ अंतर्गत २ महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंडाच्या रकमेपैकी २,००० रुपये पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.

या प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. राजेश अकोटकर यांनी मांडली. पैरवी अंमलदार पोलीस हवालदार वासुदेव म्हात्रे तसेच सीएमएस सेलचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक फजलुर रहमान काझी यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. या प्रकरणी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन व ठाणेप्रभारी डोपेवाड यांनी मार्गदर्शन केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top