Accused who robbed jeweler : शहरातील खदान परिसरातील श्री सप्तश्रृंगी अलंकार केंद्र येथे बंदुकीच्या धाकावर झालेल्या धाडसी जबरी चोरी प्रकरणाचा छडा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ७२ तासांत लावत आरोपीला जळगाव जिल्ह्यातून अटक केली. या कारवाईत पोलिसांनी विदेशी बनावटीच्या देशी कट्ट्यासह तब्बल २५ लाख ५८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रोहनसिंग सतनामसिंग बावरा, रा. जामनेर रोड, भुसावळ, जि. जळगाव असे आरोपीचे नाव आहे.

५८० सीसीटीव्ही फुटेज तपासून जळगावातून केली अटक ; पिस्टलसह २५ लाखांचा मुद्देमाल जप्त
संजय तायडे
अकोला : शहरातील खदान परिसरातील श्री सप्तश्रृंगी अलंकार केंद्र येथे बंदुकीच्या धाकावर झालेल्या धाडसी जबरी चोरी प्रकरणाचा छडा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ७२ तासांत लावत आरोपीला जळगाव जिल्ह्यातून अटक केली. या कारवाईत पोलिसांनी विदेशी बनावटीच्या देशी कट्ट्यासह तब्बल २५ लाख ५८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रोहनसिंग सतनामसिंग बावरा, रा. जामनेर रोड, भुसावळ, जि. जळगाव असे आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी जितेंद्र भास्करराव विसपुते (वय ५४), व्यवसाय सराफा, रा. युसुफ अली खदान, महादेव मंदिरासमोर, अकोला यांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ७ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.४५ ते १ वाजण्याच्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या दुकानात प्रवेश करून पिस्टलचा धाक दाखवत सोने-चांदीचे दागिने आणि ७५ हजार रुपये रोख असा एकूण ६९ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला होता. या प्रकरणी खदान पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १०३४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (१), (२), (३) तसेच आर्म अॅक्ट कलम ३, २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी तातडीने तपासासाठी विशेष पथके तयार करण्याचे आदेश दिले. उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विभागातील डीबी पथकांचे अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपासासाठी रवाना करण्यात आले.
तपासादरम्यान पोलिसांनी तब्बल ५८० ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने ३३० तर शहर डीबी पथकांनी २५० ठिकाणांचे फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढला. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी सुमारे ७०० किलोमीटरचा प्रवास केल्याची माहिती देण्यात आली. तपासात हा गुन्हा भुसावळ येथील रोहनसिंग सतनामसिंग बावरा, रा. जामनेर रोड, भुसावळ, जि. जळगाव याने केल्याचे निष्पन्न झाले. आरोपी भुसावळातील खडका रोड परिसरात येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने चादर विक्रेत्याच्या बहाण्याने परिसराची रेकी केल्याची कबुली दिली. त्यानंतर ७ मे रोजी दुपारी श्री सप्तश्रृंगी अलंकार केंद्र येथे बंदुकीच्या धाकावर जबरी चोरी केल्याचेही त्याने मान्य केले. पोलिसांनी आरोपीकडून अंदाजे १६० ग्रॅम सोन्याचे दागिने, ४४० ग्रॅम चांदीचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेला विदेशी बनावटीचा देशी कट्टा असा एकूण २५ लाख ५८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. उर्वरित मुद्देमाल जप्त करण्यासाठी पोलिसांनी पुढील तपास सुरू ठेवला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १६ मे २०२६ पर्यंत सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेळके तसेच स्थानिक गुन्हे शाखा, सायबर विभाग आणि शहर डीबी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तरीत्या पार पाडली.

