death :पत्नी आणि अल्पवयीन मुलीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याप्रकरणी अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी मनिष किसनराव म्हात्रे (वय ३५, रा. देशमुख फैल, संतोषी माता मंदिराजवळ, हनुमान बस्ती, अकोला) याला भारतीय दंड संहिता कलम ३०२ अन्वये दोषी ठरवत फाशीची शिक्षा आणि १० हजार रुपये दंड सुनावला. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या या निकालामुळे या प्रकरणाची जिल्ह्यात मोठी चर्चा झाली आहे.

चारित्र्याच्या संशयातून केली होती हत्या; अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
अकोला : पत्नी आणि अल्पवयीन मुलीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याप्रकरणी अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी मनिष किसनराव म्हात्रे (वय ३५, रा. देशमुख फैल, संतोषी माता मंदिराजवळ, हनुमान बस्ती, अकोला) याला भारतीय दंड संहिता कलम ३०२ अन्वये दोषी ठरवत फाशीची शिक्षा आणि १० हजार रुपये दंड सुनावला. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या या निकालामुळे या प्रकरणाची जिल्ह्यात मोठी चर्चा झाली आहे.
सदर प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, आरोपी मनिष किसनराव म्हात्रे हा आपल्या दोन चुलत भावांसोबत रामदासपेठ पोलिस ठाण्यात आला होता. त्याने आपण पत्नी आणि मुलीला कुऱ्हाडीने वार करून ठार मारल्याचे पोलिसांना सांगितले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संतोषी माता मंदिराजवळील हनुमान बस्ती येथील घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
घटनास्थळी आरोपीची पत्नी रश्मी मनिष म्हात्रे (वय ३० वर्षे) आणि मुलगी कु. माही मनिष म्हात्रे (वय ९ वर्षे) या घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आल्या. घटनास्थळी रक्ताने माखलेली लाकडी दांडा असलेली कुऱ्हाड तसेच रक्ताचे डाग असलेली लोखंडी सुरी आढळून आली.
आरोपीचे वडील किसनराव म्हात्रे यांच्याकडे पोलिसांनी विचारपूस केली असता, मनिष हा मागील पाच वर्षांपासून कौटुंबिक वादामुळे पत्नीपासून विभक्त राहत असल्याचे सांगण्यात आले. तसेच तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याची माहितीही समोर आली.
दि. २४ एप्रिल २०२४ रोजी पहाटे अंदाजे ४.३० ते ५ वाजण्याच्या दरम्यान मनिष याने पत्नी व मुलीच्या डोक्यावर आणि मानेवर कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी फिर्यादीच्या जबानी अहवालावरून रामदासपेठ पोलिस ठाण्यात अपराध क्रमांक १६९/२०२४, कलम ३०२ भादंवि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांनी करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता मंगेश मानकर यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. या प्रकरणात एकूण १४ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. त्यामध्ये पीडित मुलीशी संबंधित साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी तसेच अन्य साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.
या प्रकरणाच्या न्यायालयीन कामकाजाचा पाठपुरावा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील आणि रामदासपेठ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
तसेच पैरवी अधिकारी ग्रेड पोलीस उपनिरीक्षक सुनील दीपकवार, सीएमएस सेल अकोला तसेच पोलीस हवालदार अजय वानखडे, रामदासपेठ पोलिस ठाणे यांनी प्रकरणाच्या पाठपुराव्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

