Accused sentenced: अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने स्वतःच्या घरी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सिद्धेश्वर पुंडलिक इंगळे याला बुलढाणा सत्र न्यायालयाने २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास दोषीला आणखी तीन महिन्यांचा साधा कारावास भोगावा लागणार आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. जी. संतानी यांनी ६ नोव्हेंबर रोजी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

बालिकेवरील अत्याचारप्रकरणी न्यायालयाचा दणका! दोषीला २० वर्षांची शिक्षा, ५० हजारांचा दंड
बुलढाणा : अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने स्वतःच्या घरी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सिद्धेश्वर पुंडलिक इंगळे याला बुलढाणा सत्र न्यायालयाने २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास दोषीला आणखी तीन महिन्यांचा साधा कारावास भोगावा लागणार आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. जी. संतानी यांनी ६ नोव्हेंबर रोजी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
विशेष सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२४ मध्ये दुपारच्या सुमारास ही घटना घडली होती. पीडित मुलगी घरात एकटी असताना सिद्धेश्वर इंगळे याने तिला जबरदस्तीने स्वतःच्या घरी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, असा आरोप सरकार पक्षाने न्यायालयात मांडला. यापूर्वीही त्याने मुलीवर अत्याचार केल्याचे सरकार पक्षाचे म्हणणे होते.
पीडित मुलीने सांगितलेल्या घटनेच्या आधारे एका समाजसेविकेने त्याच दिवशी पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
सात साक्षीदारांची साक्ष ठरली महत्त्वपूर्ण
या खटल्यात विशेष सरकारी वकील सोनाली सावजी-देशपांडे यांनी सरकार पक्षाच्या वतीने सात साक्षीदार तपासले. पीडित मुलीला आरोपी घेऊन जात असताना पाहिलेल्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारासह वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकाऱ्यांची साक्ष न्यायालयात नोंदविण्यात आली.
साक्षीदारांच्या जबान्या आणि उपलब्ध पुराव्यांचा सखोल विचार करून न्यायालयाने सिद्धेश्वर पुंडलिक इंगळे याला भारतीय न्याय संहिता तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण करणाऱ्या (पोक्सो) कायद्यानुसार दोषी ठरवले. आरोपीला कठोर शिक्षा सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद सरकार पक्षाच्या वतीने करण्यात आला.
पीडितेला दंडाची रक्कम; अतिरिक्त भरपाईसाठी प्रकरण प्राधिकरणाकडे
न्यायालयाने आरोपीला ठोठावलेल्या ५० हजार रुपयांच्या दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय पीडितेला अतिरिक्त नुकसानभरपाई मिळावी, यासाठी हे प्रकरण बुलढाणा येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे पाठविण्यात आले आहे.

