ABHA Card Mandatory: राज्यातील १०० टक्के अनुदानित खाजगी शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत ‘आभा’ (ABHA – Ayushman Bharat Health Account) कार्ड काढणे आता अनिवार्य करण्यात आले आहे.

कार्ड न काढल्यास ५ लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय प्रतिपूर्तीचे देयक नाकारले जाणार; शिक्षण संचालनालयाचे आदेश
डोणगाव : राज्यातील १०० टक्के अनुदानित खाजगी शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत ‘आभा’ (ABHA – Ayushman Bharat Health Account) कार्ड काढणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. जर कोणत्याही कर्मचाऱ्याने हे कार्ड काढले नाही, तर त्याचे भविष्यातील ५ लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय प्रतिपूर्तीचे (Medical Reimbursement) देयक स्वीकारले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा शिक्षण संचालनालयाने दिला आहे.
या संदर्भात शिक्षण उपसंचालक (अंदाज व नियोजन) डॉ. एकनाथ आंबोकर यांनी २२ मे २०२६ रोजी परिपत्रक काढून राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षकांना तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.
कॅशलेस वैद्यकीय सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा
राज्यातील सर्व जिल्हा परिषद व खाजगी १०० टक्के अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांचा आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये समावेश करून त्यांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. या प्रस्तावाचा सार्वजनिक आरोग्य विभागाने सकारात्मक विचार केला आहे. या योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या अंगीकृत रुग्णालयांमार्फत विस्तारित ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ आणि ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ अंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष ५ लाख रुपयांचे आरोग्य संरक्षण अनुज्ञेय आहे. या लाभार्थ्यांमध्ये आता शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
…तर वैद्यकीय बिलं मिळणार नाहीत!
या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याकडे ‘आभा’ कार्ड असणे बंधनकारक आहे. शिक्षण संचालनालयाने परिपत्रकात स्पष्ट नमूद केले आहे की, “यापुढे कोणत्याही कर्मचाऱ्याचे ५ लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय प्रतिपूर्तीचे देयक (Medical Bill) ‘आभा’ कार्डाशिवाय स्वीकारले जाणार नाही.” त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी तात्काळ हे कार्ड काढून घेणे गरजेचे आहे.

