A transformer was installed :मोहाडी येथील पाणीपुरवठा योजनेसाठी उभारण्यात आलेला स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर गेल्या सहा महिन्यांपासून अपूर्ण प्रक्रियेमुळे अद्याप सुरू करण्यात आलेला नाही. परिणामी गावातील पाणीपुरवठा व्यवस्था विस्कळीत झाली असून ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. संबंधित ट्रान्सफॉर्मर तात्काळ सुरू करावा, अशी मागणी सरपंच व ग्रामस्थांनी केली आहे.

मोहाडीत पाणीपुरवठा योजना विस्कळीत, ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती
अशोक इंगळे
साखरखेर्डा : मोहाडी येथील पाणीपुरवठा योजनेसाठी उभारण्यात आलेला स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर गेल्या सहा महिन्यांपासून अपूर्ण प्रक्रियेमुळे अद्याप सुरू करण्यात आलेला नाही. परिणामी गावातील पाणीपुरवठा व्यवस्था विस्कळीत झाली असून ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. संबंधित ट्रान्सफॉर्मर तात्काळ सुरू करावा, अशी मागणी सरपंच व ग्रामस्थांनी केली आहे.
सरपंच बबनराव काळे आणि विलास आबा रिंढे यांनी साखरखेर्डा येथील महावितरणचे कनिष्ठ अभियंता रोहित पाटील यांच्याकडे पत्राद्वारे ट्रान्सफॉर्मर सुरू करण्याची मागणी केली आहे. गावातील विद्यमान ट्रान्सफॉर्मरवर विजेचा ताण वाढल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून त्याचा थेट परिणाम पाणीपुरवठ्यावर होत आहे.
ही समस्या ग्रामस्थांनी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे मांडल्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मागील वर्षी पाणीपुरवठा योजनेसाठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आला होता. सुमारे सहा महिन्यांपूर्वी खामगाव येथील ठेकेदाराने या कामाचा ठेका घेतला होता. त्यानंतर बीबी येथील पवन चव्हाण यांनी ट्रान्सफॉर्मर उभारून वीजवाहक तारा जोडण्याचे काम पूर्ण केले.मात्र ट्रान्सफॉर्मरची तपासणी करून तो सुरू करण्याची जबाबदारी महावितरणची असतानाही अद्याप अंतिम जोडणी व आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली नाही. त्यामुळे ट्रान्सफॉर्मर उभारूनही तो निष्क्रिय अवस्थेत उभा आहे.
यासंदर्भात ग्रामस्थांनी अनेकदा महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. परिणामी गावातील पाणीपुरवठा व्यवस्था प्रभावित होत असून नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन ट्रान्सफॉर्मर सुरू करण्यास होत असलेल्या विलंबाची कारणे स्पष्ट करावीत व पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

