two women were killed: नेट शेड हाऊसकडे जात असलेल्या मजुरांच्या ऑटोला भरधाव कारने धडक दिल्याने एक महिला जागीच ठार तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. १ फेब्रुवारी) लोणार ते सरस्वती रस्त्यावर सकाळी घडली. जरीनाबी आयुब शाहा (वय ४५, रा. किनगाव जट्टू) व रंजना परमेश्वर कासतोडे (वय ५३) अशी मृतक महिलांची नावे आहेत.

नेट शेड हाऊसकडे निघालेल्या महिलामजुरांवर काळाचा घाला ; लोणार–सरस्वती रस्त्यावरील घटना
मयूर गोलेच्छा
लोणार : नेट शेड हाऊसकडे जात असलेल्या मजुरांच्या ऑटोला भरधाव कारने धडक दिल्याने एक महिला जागीच ठार तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. १ फेब्रुवारी) लोणार ते सरस्वती रस्त्यावर सकाळी घडली. जरीनाबी आयुब शाहा (वय ४५, रा. किनगाव जट्टू) व रंजना परमेश्वर कासतोडे (वय ५३) अशी मृतक महिलांची नावे आहेत.
किनगाव जट्टू येथून मातमळकडे ऑटो क्रमांक MH-28-2211 ने नेट शेड हाऊसकडे रविवारी सकाळी जात होते. दरम्यान लोणार–सरस्वती रस्त्यावरील वळणावर भरधाव कार क्रमांक MH-43 AF ने या ऑटोला जोरदार धडक दिली. धडकेचा आवाज इतका भीषण होता की अँटो रस्त्याच्या कडेला उलटला आणि त्यातील महिलामजूर रस्त्यावर फेकल्या गेल्या. क्षणातच परिसरात गोंधळ उडाला; किंकाळ्या, मदतीसाठीची धावपळ आणि रक्ताने माखलेला रस्ता—असा अंगावर काटा आणणारा प्रसंग निर्माण झाला.
या भीषण अपघातात जरीनाबी आयुब शाहा (वय ४५, रा. किनगाव जट्टू) यांचा जागीच मृत्यू झाला. घरातील कर्त्या महिला असलेल्या जरीनाबी यांच्या अपघाती निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या रंजना परमेश्वर कासतोडे (वय ५३) यांचा मेहकर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या दोन झाली असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
या अपघातात आठ महिला मजूर गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना प्रथम लोणार येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारांसाठी बुलढाणा येथे हलविण्यात आले आहे. यापैकी तीन ते चार महिलांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. अँटोचालक तसेच स्विफ्ट कारचालकही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गंभीर जखमी महिलांमध्ये कल्पना विठ्ठल दमदाडे, अलका मधुकर शेवाळे, राधाबाई गजू गायकवाड, लक्ष्मी बबन करवंदे, शांताबाई परशराम शेळके, चंद्रभागाबाई जगन नागरे ,रंजना परमेश्वर कासतोडे (सर्व रा. किनगाव जट्टू) यांचा समावेश आहे.
अपघाताची माहिती मिळताच लोणार पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी संजय जाधव व पोहेकॉ गणेश तांबसकर हे सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचले. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल केले. लोणार पोलिसांनी स्विफ्ट कार चालक अतिक निसार शाहा याच्याविरोधात अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
लोणार तालुक्यातील मोठा मारुती परिसरात मोठ्या प्रमाणावर नेट शेड हाऊस असल्याने आजूबाजूच्या गावांतील शेकडो महिला रोज मजुरीसाठी ये-जा करतात. मात्र या मार्गावरील धोकादायक वळण, वेगमर्यादेचा अभाव, अपुरी सूचना फलक व्यवस्था आणि मजूर वाहतुकीकडे होणारे दुर्लक्ष यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. विशेष म्हणजे याच वळणावर यापूर्वीही अपघात होऊन जीवितहानी झाली होती. तरीही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.
या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, “आणखी किती गरीब महिलांचे बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. हा अपघात केवळ वाहतूक दुर्घटना न राहता ग्रामीण महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर सामाजिक प्रश्न बनला आहे.

