Samata Parishad : क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती महोत्सवाच्या निमित्ताने दि.२२. मे शुक्रवार रोजी अकोला सायंकाळी पाच वाजता शहरात नेहरू पार्क चौक, अशोक वाटिका व नवीन बस स्टॅन्ड चौक येथे चित्ररथाचे आगमन होत आहे .

अकोला: क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती महोत्सवाच्या निमित्ताने दि.२२. मे शुक्रवार रोजी अकोला सायंकाळी पाच वाजता शहरात नेहरू पार्क चौक, अशोक वाटिका व नवीन बस स्टॅन्ड चौक येथे चित्ररथाचे आगमन होत आहे .
एप्रिल २०२६ ते १० एप्रिल २०२७ या वर्षात केंद्र व राज्य सरकारच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानिमित्ताने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदचे संस्थापक अध्यक्ष मंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली, माजी खासदार समीर भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांच्या संकल्पनेतून महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्ररथाची निर्मिती करण्यात आली आहे. महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने हा चित्ररथ महाराष्ट्रभर फिरविण्यात येत आहे.
या चित्ररथामध्ये क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले, ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे अर्धाकृती पुतळे तसेच महात्मा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. यासोबतच समतेचे महामेरू छत्रपती शाहू महाराज आणि घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही पुतळे चित्ररथात साकारण्यात आले आहेत. विशेष म्हणजे महात्मा फुले लिखित पुस्तक व पेन या ज्ञानाच्या प्रतीकांची प्रभावी मांडणी करून समाजप्रबोधनाचा संदेश दिला जात आहे.तसेच यामध्ये भिडेवाड्याची प्रतिकृती देखील साकारण्यात आली आहे.
हा चित्ररथ समता, बंधुता, न्याय आणि ज्ञान या मूल्यांचा प्रसार करत महाराष्ट्रातील गावोगावी व शहरा-शहरांमध्ये पोहोचत आहे. प्रत्येक ठिकाणी शहरातील महामानवांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येत असून सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला जात आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आयोजित या उपक्रमाला सर्व शिव-शाहू-फुले-आंबेडकर प्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरात आगमन होताच या चित्ररथाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येत असून सामाजिक सलोखा व जागृतीचा उत्सव साजरा करीत आहे
महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त राबविण्यात येणारा हा चित्ररथ उपक्रम समाजात समतेची जाणीव दृढ करत नवचैतन्य निर्माण करणारा ठरत आहे. तरी सर्व फुले शाहू आंबेडकर विचार प्रेमी यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून चित्ररथाचे अभिवादन करावे, असे आवाहन समता परिषद जिल्हा अकोलाच्या वतीने करण्यात येत आहे.

