A Novel Experiment : बुलढाणा तालुक्यातील मासरुळ परिसरात गत काही वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्याना बसत आहे. पारंपारिक पिकांचे उत्पादन होत नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. दुष्काळ आणि वारंवारच्या नैसर्गिक संकटांना तोंड देत पारंपरिक पिकांना पर्याय शोधणाऱ्या मासरूळ येथील शेतकरी दिलीप शिणकर यांनी पानमळा शेतीचा यशस्वी प्रयोग करून आर्थिक उन्नतीचा नवा मार्ग शोधला आहे. त्यांच्या या प्रयोगामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळत आहे.

परंपरागत पिकांना पर्याय; नागवेलीमुळे एकरी लाखोंचे उत्पन्न
पंडीत सावळे
मासरुळ : बुलढाणा तालुक्यातील मासरुळ परिसरात गत काही वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्याना बसत आहे. पारंपारिक पिकांचे उत्पादन होत नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. दुष्काळ आणि वारंवारच्या नैसर्गिक संकटांना तोंड देत पारंपरिक पिकांना पर्याय शोधणाऱ्या मासरूळ येथील शेतकरी दिलीप शिणकर यांनी पानमळा शेतीचा यशस्वी प्रयोग करून आर्थिक उन्नतीचा नवा मार्ग शोधला आहे. त्यांच्या या प्रयोगामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळत आहे.
मासरूळ परिसरात सिंचन व्यवस्था उपलब्ध असली तरी मका, कापूस, सोयाबीन, हरभरा यांसारख्या पिकांना बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतात. याउलट नागवेलीच्या पानांना वर्षभर चांगला दर मिळत असल्याने अनेक तरुण शेतकरी या पिकाकडे वळत आहेत.
दिलीप शिणकर यांच्याकडे सुमारे ७ एकर वडिलोपार्जित जमीन असून, त्यांनी एक एकर क्षेत्रात नागवेलीच्या ‘कपुरी’ जातीची लागवड केली. त्यांनी सुरुवातीला शेवरी व शेवगा यांची सरी पद्धतीने लागवड करून त्यानंतर नागवेलीची लागवड केली. शेणखताचा वापर, तसेच पाऊस व गारपिटीपासून संरक्षणासाठी चारही बाजूंनी कुंपण उभारून त्यांनी पिकाची काळजी घेतली.
या पद्धतीमुळे नागवेलीच्या मळ्यातील वातावरण संतुलित राहते आणि पाण्याची बचत होते. सुरुवातीला पाटाने पाणी दिल्यानंतर ठिबक सिंचनाचा वापर करण्यात येतो. शेवगा व शेवरीच्या झाडांमुळे सावली निर्माण होत असल्याने पाण्याची गरजही तुलनेने कमी भासते.
या पिकातून वर्षाला एकरी सुमारे ६ ते ७ लाखांचे उत्पादन मिळते. खर्च वजा जाता ४ ते ५ लाखांपर्यंत निव्वळ उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांसाठी हा मोठा आर्थिक आधार ठरत आहे. नागपूर, भुसावळ, जालना, शेगाव, नांदुरा, चांदवड या बाजारपेठांमध्ये या पानांना चांगली मागणी असून, हजार पानांमागे ८०० ते १००० रुपये दर मिळतो. नागवेलीची लागवड केल्यानंतर सुमारे दहा महिन्यांनी पान तोडणी सुरू होते आणि त्यानंतर वर्षभर उत्पादन मिळत राहते. विशेष म्हणजे या मळ्यामुळे महिला मजुरांना वर्षभर रोजगार उपलब्ध होत आहे. तसेच शेवगा व शेवरीच्या झाडांमधून जनावरांसाठी चारा देखील मिळतो. नैसर्गिक संकटांवर मात करत शेतीत नवे प्रयोग केल्यास आर्थिक स्थैर्य मिळू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे दिलीप शिणकर यांचा पानमळा प्रयोग ठरत आहे.

