A major bombshell : शहराच्या पश्चिमेला असलेल्या खोरश्वर महादेव मंदिर परिसरातील शासकीय डोंगर पोखरून मोठ्या प्रमाणात मुरूम उत्खनन केल्याचे वृत्त महाब्रेकींग न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध झाल्यानंतर अखेर महसूल विभागाला जाग आला आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांत तब्बल २०० ब्रास मुरूम उत्खनन करून चोरी केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्खनन केलेल्या मुरमाची अंदाजे किंमत १ लाख २० हजार रुपये असल्याचे पोलिसांत दाखल तक्रारीत नमूद आहे. विशेष म्हणजे, महसूल प्रशासनाच्या पंचनाम्यानंतर आता गुन्हा दाखल झाला असला, तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात शासकीय जमिनीचे उत्खनन करणारे नेमके कोण, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

तहसील कार्यालयाच्या नाकाखाली शासकीय डोंगराची लूट; बातमीनंतर महसूल प्रशासनाला जाग, पोलिसांत गुन्हा दाखल!
गजानन तिडके
देऊळगाव राजा : शहराच्या पश्चिमेला असलेल्या खोरश्वर महादेव मंदिर परिसरातील शासकीय डोंगर पोखरून मोठ्या प्रमाणात मुरूम उत्खनन केल्याचे वृत्त महाब्रेकींग न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध झाल्यानंतर अखेर महसूल विभागाला जाग आला आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांत तब्बल २०० ब्रास मुरूम उत्खनन करून चोरी केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्खनन केलेल्या मुरमाची अंदाजे किंमत १ लाख २० हजार रुपये असल्याचे पोलिसांत दाखल तक्रारीत नमूद आहे. विशेष म्हणजे, महसूल प्रशासनाच्या पंचनाम्यानंतर आता गुन्हा दाखल झाला असला, तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात शासकीय जमिनीचे उत्खनन करणारे नेमके कोण, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.
बातमीचा दणका; अखेर पोलिसांत गुन्हा दाखल!
खोरश्वर पंचानन महादेव मंदिर परिसरातील शासकीय ई-क्लास जमिनीवर जेसीबीच्या साहाय्याने मुरूम उत्खनन झाल्याचा प्रकार समोर आला होता. दिवसरात्र डोंगर पोखरून मुरूमाची वाहतूक करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत होता. या प्रकरणात महसूल विभागाच्या पंचनाम्यात सुमारे २०० ब्रास मुरूमाचे उत्खनन झाल्याची नोंद असल्याचे समोर आले होते. मात्र, उत्खनन करणाऱ्यांची नावे समोर येत नसल्याने महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
या प्रकरणाबाबत महाब्रेकींगवर वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर आणि कारवाईची मागणी जोर धरू लागल्यानंतर अखेर महसूल विभागाच्या अहवालाच्या आधारे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे शासकीय जमिनीवरील गौण खनिज चोरीच्या प्रकरणाला आता तपासाची दिशा मिळाली आहे.
गुन्हा दाखल, पण उत्खननकर्ते अद्याप अज्ञात!
देऊळगाव राजा येथील ग्राम महसूल अधिकारी राजू मानसिंग तागवाले (वय ४२) यांनी याप्रकरणी लेखी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीसह तहसीलदारांच्या पत्राच्या आधारे देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कायम अप. क्र. ५१८/२०२६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७), ४८ (८) तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देऊळगाव राजा येथील सर्व्हे क्रमांक ७३ मधील शासकीय ई-क्लास जमिनीतून १९ ऑक्टोबर २०२६ पूर्वी अज्ञात व्यक्तीने अंदाजे २०० ब्रास मुरूमाचे उत्खनन करून तो चोरून नेला. या मुरमाची किंमत अंदाजे १ लाख २० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन मिंड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. १८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर डोंगर पोखरला!
खोरश्वर पंचानन महादेव मंदिर परिसरातील महसूल विभागाच्या अखत्यारीतील ई-क्लास वर्गवारीची सुमारे ११ हेक्टर डोंगराळ जमीन आहे. तहसील कार्यालयापासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर आणि शहराबाहेरील वळण रस्त्यालगत असलेल्या या डोंगरावर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवडही करण्यात आली आहे. धार्मिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्व असलेल्या या परिसरातच मुरूमाचे उत्खनन झाल्याने पर्यावरणाच्या हानीचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
आता जेसीबी मालक, वाहन क्रमांक आणि मुरूम खरेदीदारांचा शोध लागणार का?
या प्रकरणात गुन्हा दाखल होणे ही पहिली पायरी असली, तरी प्रत्यक्ष कारवाईतून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. उत्खननासाठी वापरण्यात आलेले जेसीबी कोणाचे होते? मुरूम वाहून नेणाऱ्या टिप्पर अथवा ट्रॅक्टरचे क्रमांक कोणते? उत्खनन केलेला मुरूम कुठे विकण्यात आला? या संपूर्ण व्यवहारात आणखी कोणाचा सहभाग आहे? या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे अपेक्षित आहे.
शासकीय जमिनीतील २०० ब्रास मुरूम चोरीला जातो, त्याची किंमतही निश्चित होते; मात्र प्रत्यक्ष उत्खनन करणारे अज्ञातच राहतात, ही बाब गंभीर आहे. त्यामुळे केवळ गुन्हा दाखल करून प्रकरणाची इतिश्री न करता उत्खननातील संपूर्ण साखळी उघड करण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. तसेच महसूल प्रशासन संबंधितांकडून नियमानुसार दंड आणि गौण खनिजाची रक्कम वसूल करण्यासाठी काय पावले उचलते, याकडेही शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

