Mahabreaking

[breaking_news]

living embodiment:  ‘मातृदेवो भव!’चा जागता आदर्श; आई बरी होताच लेक निघाला २५ हजार किमी धावण्याच्या यात्रेवर!

living embodiment: आईवरील अपार प्रेम आणि महादेवावरील अढळ श्रद्धा यांची अनोखी सांगड घालत बिहारमधील एका १९ वर्षीय तरुणाने तब्बल २५ हजार किलोमीटर धावत भारतभ्रमण करण्याचा संकल्प केला आहे. आईच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर तिला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी निघालेल्या या तरुणाची कहाणी सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

living

  आईच्या प्रकृतीसाठी भोलेनाथाला केला नवस; १२ ज्योतिर्लिंगांसह चारधामच्या दर्शनासाठी तरुणाची अनोखी धावती यात्रा

राहुल सोनोने

दिग्रस बू. : आईवरील अपार प्रेम आणि महादेवावरील अढळ श्रद्धा यांची अनोखी सांगड घालत बिहारमधील एका १९ वर्षीय तरुणाने तब्बल २५ हजार किलोमीटर धावत भारतभ्रमण करण्याचा संकल्प केला आहे. आईच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर तिला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी निघालेल्या या तरुणाची कहाणी सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

बिहारमधील अररिया जिल्ह्यातील बेतौरा गावचा रहिवासी असलेला मोनू मेतुरबाला ऊर्फ ‘ब्लॅक पँथर’ हा तरुण सध्या धावत भारतभ्रमण करत आहे. त्याच्या या अनोख्या यात्रेमागील कारण ऐकून अनेकांचे डोळे पाणावतात.

आईच्या प्रकृतीसाठी महादेवाला घातले साकडे

मोनूची आई ललती देवी काही महिन्यांपूर्वी गंभीर आजारी होत्या. त्यांच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला; मात्र परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली होती. आईला बरे करण्यासाठी मोनूने अखेर महादेवाला साकडे घातले. आई बरी झाल्यास बिहारपासून देशातील १२ ज्योतिर्लिंगे आणि चारधाम येथे धावत जाऊन दर्शन घेण्याचा नवस त्याने केला.

महादेवाच्या कृपेने आईच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा झाली आणि त्या ठणठणीत बऱ्या झाल्या. त्यानंतर मोनूने महादेवाला दिलेला शब्द पूर्ण करण्याचा निर्धार केला आणि आपल्या धावत्या यात्रेला सुरुवात केली.

पाटण्यापासून सुरू झाला २५ हजार किलोमीटरचा प्रवास

१५ मार्च २०२६ रोजी मोनूने बिहारमधील पाटणा येथून आपल्या धावत्या यात्रेला प्रारंभ केला. कोणत्याही वाहनाचा आधार न घेता, केवळ पायांत साधे बूट, अंगात पिवळा बनियन, कपाळावर भस्माचा टिळा आणि हातात भगवा ध्वज घेऊन तो मार्गक्रमण करत आहे.

दररोज सुमारे ५० ते ८० किलोमीटर अंतर धावत पूर्ण करण्याचे त्याचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत त्याने सुमारे आठ हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केल्याचे सांगितले जाते. या प्रवासात झारखंडमधील बैद्यनाथ धाम, आंध्र प्रदेशातील श्रीशैलम, तमिळनाडूमधील रामेश्वरम आणि महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर यांसह पाच ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतल्याची माहिती आहे. एकूण सुमारे २५ हजार किलोमीटरचे अंतर पार करून १२ ज्योतिर्लिंगे आणि चारधामचे दर्शन घेण्याचे त्याचे ध्येय आहे.

विदर्भातील प्रवासादरम्यान पातूर-अकोला मार्गावर स्वागत

सध्या मोनूचा प्रवास महाराष्ट्रासह विदर्भातून सुरू आहे. पातूर-अकोला महामार्गावर त्याचे आगमन झाल्यानंतर स्थानिक शिवभक्तांनी त्याचे उत्साहात स्वागत केले. वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष निर्भय पोहरे यांच्यासह उपस्थितांनी मोनूला पुष्पहार घालून त्याच्या संकल्पाचे कौतुक केले आणि पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

ऊन, वारा, पाऊस, पायांना पडणारे फोड आणि शारीरिक थकवा अशा अनेक अडचणींवर मात करत मोनू आपला प्रवास सुरू ठेवत आहे. त्याच्या या प्रवासात रस्त्यावर भेटणारे नागरिक त्याला जेवण, पाणी तसेच रात्री मुक्कामासाठी जागा उपलब्ध करून देत आहेत. अनेक तरुणही काही किलोमीटर त्याच्यासोबत धावत त्याचा उत्साह वाढवत आहेत.

आईवरील प्रेमाचा प्रेरणादायी संदेश

मोनूची ही धावती यात्रा केवळ धार्मिक संकल्पपूर्तीपुरती मर्यादित नाही, तर आईवरील प्रेम, दिलेला शब्द पाळण्याची जिद्द आणि श्रद्धेच्या बळावर संकटांवर मात करण्याची प्रेरणादायी कहाणी आहे. आईच्या आरोग्यासाठी केलेला नवस पूर्ण करण्याच्या ध्यासातून एका तरुणाने हजारो किलोमीटरचा प्रवास सुरू केला आहे.

‘मातृदेवो भव’ या संस्कारांचा जिवंत आदर्श ठरणाऱ्या मोनूच्या या प्रयत्नातून आईचे स्थान किती अनमोल आहे, याची जाणीव होते. त्याची ही अनोखी धावती यात्रा अनेकांसाठी श्रद्धा, मातृप्रेम आणि दृढनिश्चयाचा प्रेरणास्रोत ठरत आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top