A leopard : मेहकर तालुक्यातील कासारखेड परिसरात बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडली असून, यात एका कालवडीचा बळी गेला आहे. कासारखेड येथील शेतकरी विश्वास दादाराव सवडतकर हे गुरुवारी (दि. १ जानेवारी २०२६) सकाळी शेतात गेले असता त्यांनी बांधलेली दोन जनावरे आढळून आली. त्यापैकी चार ते पाच वर्षांची एक कालवड बिबट्याने ठार केल्याचे निदर्शनास आले.

हिवरा आश्रम : मेहकर तालुक्यातील कासारखेड परिसरात बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडली असून, यात एका कालवडीचा बळी गेला आहे. कासारखेड येथील शेतकरी विश्वास दादाराव सवडतकर हे गुरुवारी (दि. १ जानेवारी २०२६) सकाळी शेतात गेले असता त्यांनी बांधलेली दोन जनावरे आढळून आली. त्यापैकी चार ते पाच वर्षांची एक कालवड बिबट्याने ठार केल्याचे निदर्शनास आले.
घटनेची माहिती मिळताच सतिश मवाळ यांनी तातडीने घाटबोरी वनपरिक्षेत्र अंतर्गत माडवा वर्तुळ, वडाळी बिटचे वनपाल व्ही. टी. मापारे तसेच वनरक्षक एस. ए. पडघान यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. त्याची दखल घेत वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी सकाळी १० वाजता घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली.
यावेळी तलाठी देशमुख, कृषी सहाय्यक शंकर वाघमारे, राजू सवडतकर, सतिश मवाळ यांच्यासह गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
दरम्यान, ३१ डिसेंबरच्या सकाळीही कळंबेश्वर–दुधा परिसरात बिबट्याची पिल्ले आढळून आल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण कासारखेड परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या पार्श्वभूमीवर कासारखेड परिसरातील शेतकऱ्यांनी शेतीपंपाची वीज दिवसा देण्याची मागणी केली आहे. सध्या ऊस, तूर, गहू व हरभरा अशी पिके मोठ्या प्रमाणावर असल्याने रात्री पाणी देताना जीविताला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी व शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

