A horrific accident : समृद्धी महामार्गावरील भारत पेट्रोल पंपासमोर ट्रक व अज्ञात वाहनामध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना ४ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून डोणगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.

डोणगाव : समृद्धी महामार्गावरील भारत पेट्रोल पंपासमोर ट्रक व अज्ञात वाहनामध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना ४ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून डोणगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जनकलाल शामराव चिलाटे (वय २८, व्यवसाय मजुरी, रा. कालवा, ता. आटनेर, जि. बैतुल, मध्यप्रदेश) व त्यांच्यासोबत सुखदेव बारसकर (रा. ऐनखेड, पोस्ट काकली दामोना, बैलकुंद, जि. बैतुल, मध्यप्रदेश) हे टाटा कंपनीचा ट्रक (क्रमांक MH-28-BB-5444) मधून लोखंडी टिनशेडचे पोल घेऊन चिखलीहून मेहकरमार्गे कारंजा लाडकडे जात होते. समृद्धी महामार्गावरील नागपूर लेनमध्ये चॅनल क्रमांक २६९ जवळ भारत पेट्रोल पंपासमोर ट्रकचालक नारायण रावसाहेब ठेंग (रा. खंडाळा, मकरध्वज, ता. चिखली, जि. बुलढाणा) याने वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रकमध्ये बसलेले सुखदेव बारसकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर वाहनाचेही मोठे नुकसान झाले. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
या प्रकरणी संबंधित ट्रकचालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास डोणगाव पोलीस करत आहेत. दरम्यान, समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून सुरक्षित वाहनचालना करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

