Lives of two accident: रस्त्यावर अपघात झाल्यानंतर मदतीसाठी थांबावे की नाही, पोलिसांच्या चौकशीचा त्रास होईल का, अशा विविध शंकांमुळे अनेक जण अपघातग्रस्तांकडे दुर्लक्ष करतात. मात्र, प्रसंगावधान राखून वेळीच मदत केल्यास एखाद्याचा जीव वाचू शकतो. याचाच प्रत्यय देऊळगाव राजा-चिखली मार्गावर आला. सैनिक कन्या गायत्री भीमराव चाटे हिने प्रसंगावधान राखत रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या दोन मोटारसायकलस्वारांसाठी तातडीने रुग्णवाहिका बोलावली आणि दोघांना वेळेत उपचार मिळवून दिले.

रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडले होते दोघे; सैनिक कन्येने धाव घेत वाचविले दोन जीव
गजानन तिडके
देऊळगाव राजा : रस्त्यावर अपघात झाल्यानंतर मदतीसाठी थांबावे की नाही, पोलिसांच्या चौकशीचा त्रास होईल का, अशा विविध शंकांमुळे अनेक जण अपघातग्रस्तांकडे दुर्लक्ष करतात. मात्र, प्रसंगावधान राखून वेळीच मदत केल्यास एखाद्याचा जीव वाचू शकतो. याचाच प्रत्यय देऊळगाव राजा-चिखली मार्गावर आला. सैनिक कन्या गायत्री भीमराव चाटे हिने प्रसंगावधान राखत रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या दोन मोटारसायकलस्वारांसाठी तातडीने रुग्णवाहिका बोलावली आणि दोघांना वेळेत उपचार मिळवून दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार, दि. ८ ऑगस्ट रोजी रात्री देऊळगाव राजा-चिखली मार्गावरील समर्थ कृषी महाविद्यालयासमोर दोन मोटारसायकलस्वार अपघातग्रस्त होऊन रस्त्यावर पडले होते. पुंजाराम काकडे (रा. मेहुणा राजा) आणि जुम्मेखा पठाण (रा. सिंगाव जहागीर) अशी त्यांची नावे आहेत. दोघेही रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडले असताना परिसरातून जाणारे अनेकजण तेथे थांबत नव्हते.
यावेळी गायत्री भीमराव चाटे हिने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून विलंब न करता रुग्णवाहिकेला फोन केला. काही वेळातच रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. दोन्ही जखमींना तातडीने देऊळगाव राजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.
सैनिक कन्येचे कौतुक
अपघातग्रस्तांना वेळीच मदत मिळवून देणाऱ्या गायत्री चाटे हिचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश गीते यांनी कौतुक केले. “आपले काम बाजूला ठेवून प्रसंगावधान राखत अपघातग्रस्तांना मदत करणे ही माणुसकीची खरी ओळख आहे. वडिलांच्या सामाजिक कार्याचा वारसा मुलीनेही जपला आहे. तिच्या हातून असे मदतकार्य यापुढेही घडत राहो,” अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, पुंजाराम काकडे व जुम्मेखा पठाण यांच्या कुटुंबीयांनीही अपघातानंतर तत्काळ मदत मिळवून दिल्याबद्दल गायत्री चाटे तसेच आघाव रुग्णवाहिका सेवेचे आभार मानले.
यापूर्वीही दाखविले प्रसंगावधान
गायत्री चाटे हिने यापूर्वीही रात्री बसच्या छतावरून धोकादायक पद्धतीने प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला पाहून त्याच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार घेतला होता. तिच्या या सतर्कतेबद्दल एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकांसह पोलीस निरीक्षकांनी तिचे कौतुक केले होते.
अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करण्यासाठी नागरिकांनी भीती न बाळगता तत्काळ रुग्णवाहिका किंवा संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा, असा संदेश या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

