Mahabreaking

[breaking_news]

Allegations:  देऊळगाव राजा नगर परिषदेत कथित अनियमिततेचा आरोप; शहर विकास आघाडी आक्रमक

Allegations: देऊळगाव राजा नगर परिषदेच्या कारभारातील कथित अनियमितता, निविदा प्रक्रियेतील गैरप्रकार, पदपाती प्रशासन आणि विरोधी नगरसेवकांना माहितीपासून दूर ठेवण्यात येत असल्याचा आरोप करत शहर विकास आघाडीने जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे सविस्तर तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Allegations

 निविदा प्रक्रियेवर संशय, कारभारावर प्रश्नचिन्ह; नगर विकास आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गजानन तिडके 

देऊळगाव राजा : देऊळगाव राजा नगर परिषदेच्या कारभारातील कथित अनियमितता, निविदा प्रक्रियेतील गैरप्रकार, पदपाती प्रशासन आणि विरोधी नगरसेवकांना माहितीपासून दूर ठेवण्यात येत असल्याचा आरोप करत शहर विकास आघाडीने जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे सविस्तर तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

शहर विकास आघाडीच्या गटनेत्या रंजनाताई अनिल रामाने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. निवेदनात नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन तसेच मनुष्यबळ सेवा पुरवठा या ई-निविदा प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

निवेदनानुसार, सन २०२६-२७ साठीची घनकचरा व्यवस्थापनाची निविदा नियमानुसार वेळेत उघडण्यात आली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच मनुष्यबळ सेवा पुरवठ्याच्या निविदेतील अटी विशिष्ट कंत्राटदाराला लाभ मिळावा, या हेतूने तयार करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

याशिवाय, सर्वसाधारण सभेतील महत्त्वाचे विषय जाणीवपूर्वक चर्चेसाठी न आणणे, विरोधी नगरसेवकांना अधिकृत कार्यक्रमांतून डावलणे, आवश्यक कागदपत्रे व माहिती वेळेवर उपलब्ध करून न देणे तसेच महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक नगर अधिनियम, १९६५ मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

या सर्व आरोपांची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकारी व संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी. तसेच भविष्यात नगर परिषदेचा कारभार पारदर्शक, नियमबद्ध आणि सर्व नगरसेवकांना समान वागणूक देणारा राहील, यासाठी आवश्यक निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

या निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकारी बुलढाणा यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करताना शहर विकास आघाडीच्या गटनेत्या रंजनाताई रामाने, नगरसेवक कोटकर काशीफ खान, नगरसेविका दिशाताई खांडेभराड, नगरसेवक शिवाजी मेहत्रे, शेख अन्वर, नगरसेविका शितलताई खराट, विद्याताई कासारे तसेच अॅड. रामेश्वर रामाने आदी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top