Sakharkherda bus station: साखरखेर्डा येथील बसस्थानकाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, प्रवाशांच्या वाढत्या गैरसोयी लक्षात घेता सध्याच्याच ठिकाणी सर्व सोयींनी युक्त मिनी बसस्थानक उभारण्यात यावे, अशी मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुर देशपांडे यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

प्रवाशांना मूलभूत सुविधांची प्रतीक्षा; साखरखेर्डा मिनी बसस्थानकासाठी भाजपचा पाठपुरावा
साखरखेर्डा : साखरखेर्डा येथील बसस्थानकाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, प्रवाशांच्या वाढत्या गैरसोयी लक्षात घेता सध्याच्याच ठिकाणी सर्व सोयींनी युक्त मिनी बसस्थानक उभारण्यात यावे, अशी मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुर देशपांडे यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात देशपांडे यांनी नमूद केले आहे की, साखरखेर्डा हे परिसरातील महत्त्वाचे व्यापारी व प्रशासकीय केंद्र असून गावाची लोकसंख्या सुमारे २५ ते ३० हजार आहे. येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, भारतीय स्टेट बँक, १२ पतसंस्था, पोलीस स्टेशन, तीन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दोन खासगी प्राथमिक शाळा, तीन माध्यमिक विद्यालये, तीन इंग्रजी माध्यमाच्या शाळा, दोन पेट्रोल पंप तसेच मोठी व्यापारी बाजारपेठ आहे. याशिवाय नव्याने मंजूर झालेले अप्पर तहसील कार्यालय लवकरच कार्यान्वित होणार असून ग्रामीण रुग्णालयाची नवीन इमारतही पूर्ण झाली आहे.
साखरखेर्डा हे सुमारे ७५ गावांसाठी बँकिंग, पोलीस, आरोग्य, शैक्षणिक आणि व्यापारी व्यवहारांचे प्रमुख केंद्र असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा सुरू असते. मात्र, अद्यापही येथे सुसज्ज बसस्थानकाची सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
नियमित बससेवेचा अभाव, बसची तासन्तास प्रतीक्षा, तसेच ऊन, वारा आणि पावसात उभे राहून प्रवासाची वाट पाहण्याची वेळ प्रवाशांवर येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे देशपांडे यांनी अधोरेखित केले आहे.
यापूर्वी अनेक वेळा बसस्थानकाची मागणी करण्यात आली होती. मात्र, जागेच्या उपलब्धतेच्या कारणास्तव हा प्रश्न मार्गी लागला नाही. त्यामुळे सध्याच्याच जागेवर सुसज्ज मिनी बसस्थानक उभारून प्रवाशांसाठी प्रशस्त प्रतीक्षागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा, बसथांबा तसेच महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
प्रवाशांच्या दैनंदिन अडचणी लक्षात घेऊन साखरखेर्डा बसस्थानकाचा प्रश्न तातडीने निकाली काढावा आणि आवश्यक निधी उपलब्ध करून विकासकामांना गती द्यावी, अशी मागणीही अंकुर देशपांडे यांनी परिवहन मंत्र्यांकडे केली आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

