A nap proved fatal: चालकाला झोपेची डुलकी लागल्याने ट्रकचा भीषण अपघात होवून चालक जागीच ठार झाला. ही घटना समृद्धी महामार्गावरील डोणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर कॉरिडॉरवर चैनेज क्रमांक 269.40 येथे मंगळवारी (4 ऑगस्ट) पहाटे सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास घडली.या अपघातात क्लीनर किरकोळ जखमी झाला.तसेच ट्रकच्या कॅबीनचा पूर्णपणे चुराडा झाला होता.

समृद्धी महामार्गावर पहाटेचा भीषण अपघात; अज्ञात वाहनाला ट्रकची मागून धडक, चालक ठार
डोणगाव : चालकाला झोपेची डुलकी लागल्याने ट्रकचा भीषण अपघात होवून चालक जागीच ठार झाला. ही घटना समृद्धी महामार्गावरील डोणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर कॉरिडॉरवर चैनेज क्रमांक 269.40 येथे मंगळवारी (4 ऑगस्ट) पहाटे सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास घडली.या अपघातात क्लीनर किरकोळ जखमी झाला.तसेच ट्रकच्या कॅबीनचा पूर्णपणे चुराडा झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून नागपूरकडे जाणारा ट्रक (क्र. RJ-11-GD-4412) समृद्धी महामार्गावरून जात असताना चालकाला झोपेची डुलकी लागली. त्यामुळे ट्रकवरील त्याचा ताबा सुटून समोर जात असलेल्या अज्ञात वाहनाला मागून जोरदार धडक बसली. या भीषण धडकेत ट्रकच्या केबिनचा पूर्णपणे चुराडा झाला.
या अपघातात ट्रक चालक लेकराच (वय 26), रा. टेडीबगिया, ता. व जि. आग्रा (उत्तर प्रदेश) याच्या डोक्यासह शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रकमधील क्लीनर सोनू निरंजन निषाद, रा. फरे, जि. मथुरा (उत्तर प्रदेश) हा किरकोळ जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले. तसेच जखमी क्लीनरला तातडीने रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.या अपघाताचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.

