Maulana Ismail Ashaati : येथील शुक्रवारी (३१ जुलै) झालेल्या जुम्म्याच्या नमाजपूर्वीच्या खुतब्यात मौलाना इस्माईल अशाअती यांनी नमाजींना नम्रता, सदाचार आणि मानवतेचा संदेश दिला. चांगला माणूस बनण्यासाठी अहंकार, गर्व आणि तकब्बुराचा त्याग करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

संपत्ती, पद आणि ज्ञानाचा गर्व टाळा; आत्मपरीक्षणाचे मौलाना इस्माईल अशाअती यांचे आवाहन
बाळापूर : येथील शुक्रवारी (३१ जुलै) झालेल्या जुम्म्याच्या नमाजपूर्वीच्या खुतब्यात मौलाना इस्माईल अशाअती यांनी नमाजींना नम्रता, सदाचार आणि मानवतेचा संदेश दिला. चांगला माणूस बनण्यासाठी अहंकार, गर्व आणि तकब्बुराचा त्याग करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.


मौलाना इस्माईल अशाअती यांनी सांगितले की, प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनातील वाईट सवयींपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामध्ये अहंकार, गर्व आणि तकब्बुर हे सर्वात घातक दोष असून ते माणसाला नैतिक अधःपतनाकडे नेतात. संपत्ती, पद, सत्ता, ज्ञान, सौंदर्य आणि वंशाचा अभिमान ही गर्वाची प्रमुख कारणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अहंकारामुळे माणूस अल्लाहच्या कृपेपासून तसेच समाजातील प्रेम, विश्वास आणि आपुलकीपासून दूर जातो. इस्लाम हा नम्रता, साधेपणा, परस्पर सन्मान आणि उत्तम आचरणाचा संदेश देणारा धर्म असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी उपस्थित नमाजींना आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन करत अहंकाराचा त्याग करून नम्रता, प्रेम, बंधुभाव आणि मानवतेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले. समाजात चांगले विचार, सदाचार आणि परस्पर आदराची भावना रुजविल्यासच खऱ्या अर्थाने आदर्श व्यक्तिमत्त्व घडू शकते, असेही त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
खुतब्यानंतर उपस्थितांनी समाजात सौहार्द, नैतिक मूल्ये आणि मानवतेची जपणूक करण्याचा संकल्प व्यक्त केला.

