Mahabreaking

[breaking_news]

Continuous rainfall :साखरखेर्डा परिसरात संततधार पाऊस; नदी-नाल्यांना पूर, शेंदुर्जन मंडळात सर्वाधिक १२५ मिमी पर्जन्य

Continuous rainfall : साखरखेर्डा परिसरासह सिंदखेडराजा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले असून तलाव, पाझर तलाव आणि धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. या पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Continuous rainfall

  दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने सिंदखेडराजा तालुका जलमय; भोगावती, कोराडी नदी दुथडी भरून

साखरखेर्डा : साखरखेर्डा परिसरासह सिंदखेडराजा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले असून तलाव, पाझर तलाव आणि धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. या पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

गेल्या दोन दिवसांपासून परिसरात सातत्याने सुरू असलेल्या पावसाने अनेक दिवसांपासून कोरडे पडलेले ओढे-नाले पुन्हा खळाळून वाहू लागले आहेत. सोमवारी रात्री झालेल्या दमदार पावसामुळे साखरखेर्डा येथून वाहणारी भोगावती नदी दुथडी भरून वाहत असून, सवडद परिसरातील कोराडी नदीलाही पूर आला आहे. परिणामी कोराडी धरणातील पाणीसाठा सुमारे ७० टक्क्यांपर्यंत वाढल्याची माहिती मिळाली आहे. तसेच लघू प्रकल्प, पाझर तलाव आणि विहिरींच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे.

या पावसाचा खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग तसेच इतर पिकांना मोठा फायदा झाला असून सर्वच पिकांची वाढ जोमात होत आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

महसूल विभागाच्या नोंदीनुसार, सिंदखेडराजा तालुक्यात सरासरी ९८.०१ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये शेंदुर्जन मंडळात सर्वाधिक १२५.०५ मिमी पाऊस झाला. त्याखालोखाल साखरखेर्डा मंडळात ११८.०५ मिमी, मलकापूर पांग्रा मंडळात ९७.०८ मिमी, सिंदखेडराजा मंडळात ९१.०५ मिमी, दुसरबीड मंडळात ८९.०८ मिमी, सोनोशी मंडळात ८३.०० मिमी आणि किनगाव राजा मंडळात ७२.०३ मिमी पावसाची नोंद झाली.

दरम्यान, रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. साखरखेर्डा–मेरा बुद्रुक मार्गावरील शिंदी गावाजवळ रस्त्यावर मोठा वृक्ष कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळित झाली होती. प्रशासनाने तातडीने जेसीबीच्या सहाय्याने वृक्ष हटवून रस्ता मोकळा केल्याने वाहतूक पूर्ववत सुरू झाली.

संततधार पावसामुळे तालुक्यातील जलस्रोतांना नवसंजीवनी मिळाली असून, आगामी काळातही पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणे आणि तलाव पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top