Mahabreaking

[breaking_news]

district bank elections :जिल्हा बँक निवडणुकीत माघारीला ब्रेक; शिंगणे-जाधवांच्या बिनविरोधीनंतर राजकीय घडामोडींना वेग

district bank elections : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत गुरुवारी एकाही उमेदवाराने नामांकन अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे उर्वरित १९ संचालकपदांसाठी दाखल झालेले २५४ वैध अर्ज कायम आहेत. माघारीची अंतिम मुदत ११ ऑगस्टपर्यंत असल्याने पुढील तीन ते चार दिवसांत राजकीय हालचाली, पॅनल निर्मिती, जागावाटप आणि इच्छुकांची मनधरणी यांना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

add

१९ जागांसाठी २५४ अर्ज कायम; अखेरच्या चार दिवसांत पॅनल, तडजोडी आणि मनधरणीची रणधुमाळी

गजानन तिडके 

बुलढाणा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत गुरुवारी एकाही उमेदवाराने नामांकन अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे उर्वरित १९ संचालकपदांसाठी दाखल झालेले २५४ वैध अर्ज कायम आहेत. माघारीची अंतिम मुदत ११ ऑगस्टपर्यंत असल्याने पुढील तीन ते चार दिवसांत राजकीय हालचाली, पॅनल निर्मिती, जागावाटप आणि इच्छुकांची मनधरणी यांना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यापूर्वी सोसायटी मतदारसंघातून माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे बिनविरोध निवडून आल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय चित्राला वेगळे वळण मिळाले आहे. पूर्वी वेगवेगळ्या राजकीय गटांत सक्रिय असलेले हे दोन्ही नेते आता एकाच संचालक मंडळात एकत्र दिसणार असल्याने सहकार क्षेत्रात नव्या सत्तासमीकरणांची चर्चा रंगली आहे.
उर्वरित १९ जागांसाठी २५४ वैध अर्ज कायम असले, तरी प्रत्यक्ष उमेदवारांची संख्या तेवढी नाही. अनेक इच्छुकांनी तांत्रिक कारणांमुळे किंवा पर्याय खुला ठेवण्यासाठी एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे माघारीनंतरच अंतिम उमेदवारांची निश्चित संख्या स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे केवळ संचालकपदांची निवड म्हणून न पाहता, सहकार क्षेत्रातील भविष्यातील राजकीय नेतृत्व आणि सत्तासंतुलनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या लढती म्हणून पाहिले जात आहे. विविध राजकीय गटांमध्ये पडद्यामागे चर्चांचे फेरे सुरू असून, सर्वसमावेशक पॅनल उभे राहते की मतदारसंघनिहाय थेट लढती होतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
बँकेचा पूर्वेतिहासही या निवडणुकीला महत्त्व प्राप्त करून देणारा आहे. सन २०१० मध्ये संचालक झाल्यानंतर तत्कालीन आमदार डॉ. संजय कुटे यांनी बँकेची आर्थिक स्थिती पाहून दोन वर्षांतच राजीनामा दिला होता. त्यानंतर सरकारी मदतीच्या अपेक्षेने ज्येष्ठ संचालक धृपतराव सावळे यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली; मात्र अपेक्षित आर्थिक सहाय्य न मिळाल्याने त्यांनीही पदाचा राजीनामा दिला होता.
निवडणूक नियमांनुसार उमेदवाराने लेखी स्वरूपात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे माघारीची सूचना दिल्यानंतरच ती वैध मानली जाते आणि त्यानंतर ती मागे घेता येत नाही. त्यामुळे गुरुवारी एकही माघार न झाल्याने सध्याचे चित्र कायम असले, तरी अंतिम क्षणापर्यंत राजकीय घडामोडी वेगाने बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top