Government services: महसूल कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या, विविध दाखल्यांसाठी होणारी धावपळ आणि रखडलेल्या महसुली प्रकरणांना गती देण्याच्या उद्देशाने महसूल व वन विभागाच्या वतीने आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिरा’ला गुरुवारी तेल्हारा येथे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच डॉ. केशव बळीराम हेडगेवार सभागृह नागरिकांनी गजबजून गेले होते. विविध विभागांचे अधिकारी एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने अनेक अर्ज, तक्रारी आणि महसुली प्रकरणांचा जागेवरच निपटारा करण्यात आला.

दाखले, फेरफार, योजनांचा लाभ एका ठिकाणी; ‘महाराजस्व समाधान शिबिरा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
तेल्हारा : महसूल कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या, विविध दाखल्यांसाठी होणारी धावपळ आणि रखडलेल्या महसुली प्रकरणांना गती देण्याच्या उद्देशाने महसूल व वन विभागाच्या वतीने आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिरा’ला गुरुवारी तेल्हारा येथे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच डॉ. केशव बळीराम हेडगेवार सभागृह नागरिकांनी गजबजून गेले होते. विविध विभागांचे अधिकारी एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने अनेक अर्ज, तक्रारी आणि महसुली प्रकरणांचा जागेवरच निपटारा करण्यात आला.
शिबिराचे उद्घाटन अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या हस्ते झाले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, उपविभागीय अधिकारी (अकोट) मनोज लोणारकर, तहसीलदार (अकोट) सुनील चव्हाण, तहसीलदार (तेल्हारा) महेश रामगुंडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
शिबिरात महसूल, भूमी अभिलेख, पंचायत राज, कृषी, सामाजिक न्याय, महिला व बालविकास, आरोग्य, शिक्षण, महावितरण, नगर परिषद आदी विभागांचे स्वतंत्र सेवा कक्ष उभारण्यात आले होते. उत्पन्न, जात व निवासी दाखले, वारस नोंद, फेरफार, महसुली प्रकरणे, विविध शासकीय योजनांचे अर्ज, प्रमाणपत्रे तसेच इतर प्रशासकीय सेवांसाठी नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला. अनेक अर्जांवर तत्काळ निर्णय घेण्यात आल्याने नागरिकांचा वेळ, पैसा आणि कार्यालयीन फेऱ्यांची बचत झाली.
यावेळी विविध शासकीय योजनांतील पात्र लाभार्थ्यांना लाभांचे वितरण करण्यात आले. तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देऊन नागरिकांना आवश्यक मार्गदर्शनही करण्यात आले. शासनाच्या सेवा अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले. अशा शिबिरांमुळे शासकीय सेवा गावपातळीवर उपलब्ध होत असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर, तहसीलदार सुनील चव्हाण आणि तहसीलदार महेश रामगुंडे यांनी नागरिकांनी अशा शिबिरांचा अधिकाधिक लाभ घेऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, तसेच महसुली कामे वेळेत पूर्ण करून घ्यावीत, असे आवाहन केले.
कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
शिबिरात उपलब्ध करून देण्यात आलेल्या प्रमुख सेवा
उत्पन्न, जात व निवासी दाखले, वारस नोंद व फेरफार प्रकरणे, महसुली तक्रारींची सुनावणी, विविध शासकीय योजनांचे अर्ज व मार्गदर्शन, पात्र लाभार्थ्यांना लाभवितरण,विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी थेट संवाद

