Senior citizen from Nimgaon Guru : तालुक्यातील निमगाव गुरु येथील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

देऊळगाव राजा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद
गजानन तिडके
देऊळगाव राजा : तालुक्यातील निमगाव गुरु येथील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दामोधर गोपाल चित्ते (वय 68, रा. निमगाव गुरु, ता. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) यांनी बुधवारी दुपारी 1.50 वाजण्यापूर्वी अज्ञात कारणातून विषारी औषध प्राशन केले. त्यांची प्रकृती गंभीर झाल्यानंतर नातेवाईकांनी तातडीने उपचारासाठी देऊळगाव मही येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
मात्र, ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या वैद्यकीय कायदेशीर अहवाल (एमएलसी) व आकस्मिक नोंद क्रमांक 251/2026 यांच्या आधारे देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात मर्ग क्रमांक 31/2026 अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम 194 अंतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
या प्रकरणाची नोंद पोलीस हेड कॉन्स्टेबल विश्वनाथ काकड यांनी केली असून, पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद साळवे करीत आहेत.
दरम्यान, दामोधर चित्ते यांनी विषारी औषध का प्राशन केले, यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून सर्व बाबींचा तपास सुरू आहे. नातेवाईकांचे जबाब, वैद्यकीय अहवाल तसेच इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

