Dam water becomes turbid : सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आल्याने धरणातील पाण्यात गाळाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने बाळापूर नगर परिषदेने महत्त्वाची सार्वजनिक सूचना जारी केली आहे.

बाळापूरकरांनी घ्यावी खबरदारी; दूषित पाण्यामुळे आजारांचा धोका, नगर परिषदेची जनजागृती
बाळापूर : सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आल्याने धरणातील पाण्यात गाळाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने बाळापूर नगर परिषदेने महत्त्वाची सार्वजनिक सूचना जारी केली आहे.

मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गढूळ व दूषित पाणी थेट पिण्यासाठी वापरल्यास जुलाब, उलटी, पोटदुखी तसेच पाण्याद्वारे पसरणाऱ्या संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पिण्याचे पाणी उकळून व गाळूनच वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या जनजागृती मोहिमेचा भाग म्हणून मंगळवार, दि. २८ जुलै २०२६ रोजी संपूर्ण बाळापूर शहरात लाउडस्पीकरद्वारे नागरिकांना आवश्यक सूचना प्रसारित करण्यात आल्या. सुरक्षित पिण्याच्या पाण्याबाबत जनजागृती करून संभाव्य साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्याचा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

नगर परिषद प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे, परिसरात स्वच्छता राखण्याचे, केवळ सुरक्षित व उकळलेले पाणी पिण्याचे तसेच जुलाब, उलटी, पोटदुखी किंवा इतर आजारांची लक्षणे आढळल्यास तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेऊन प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असेही नगर परिषद प्रशासनाने नमूद केले आहे.

