head constable arrested: गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीच्या पीसीआरमध्ये वाढ न करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणार्या बिबी पोलीस ठाण्याच्या हेड कॉस्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) बुलढाणा मंगळवारी (२८ जुलै) रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

बुलढाणा एसीबीची धडक कारवाई ; किनगाव जट्टू बसस्थानक परिसरात रचला सापळा
बुलढाणा : गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीच्या पीसीआरमध्ये वाढ न करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या बिबी पोलीस ठाण्याच्या हेड कॉस्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) बुलढाणा मंगळवारी (२८ जुलै) रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, सतीश रामभाऊ नागरे (वय ४०), पोलीस हेडकॉन्स्टेबल, पोलीस ठाणे बिबी, रा. जऊळका, ता. सिंदखेडराजा यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदाराचे भाऊ व पुतण्या यांच्याविरुद्ध बिबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, त्या गुन्ह्यात घेतलेल्या पीसीआर (Police Custody Remand) मध्ये वाढ न करण्यासाठी तसेच संबंधित गुन्ह्यात मदत करण्याच्या बदल्यात आरोपी पोलीस कर्मचाऱ्याने सुरुवातीला ₹६,००० ते ₹७,००० लाचेची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे प्राप्त झाली होती.
तक्रारीची पडताळणी २८ जुलै रोजी करण्यात आली. पडताळणीदरम्यान संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने तडजोडीनंतर ₹५,००० स्वीकारण्यास संमती दिल्याचे निष्पन्न झाले. यानंतर एसीबीने लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू बसस्थानक परिसरात सापळा रचला. पंचांसमक्ष तक्रारदाराकडून ₹५ हजारांची लाच स्वीकारताना पोलीस हेडकॉन्स्टेबल सतीश नागरे यांना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे एसीबीने स्पष्ट केले आहे.
ही कारवाई एसीबी अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे आणि बुलढाणा घटकाचे पोलीस उपअधीक्षक भागोजी चौरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक विलास गुसिंगे व एसीबी बुलढाणा पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या अंमलात आणली.
दरम्यान, शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडून लाचेची मागणी झाल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलढाणा यांच्याशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक भागोजी चौरमले यांनी केले आहे.

