Jijau Agro Agency : देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथे अज्ञात चोरट्यांनी कृषी साहित्याच्या दुकानाचे लोखंडी शटर उघडून तब्बल १ लाख ९० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना रविवारी मध्यरात्रीनंतर उघडकीस आली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

शटरचे नट-बोल्ट उघडून चोरट्यांचा धाडसी डाव; कृषी साहित्याच्या दुकानातून १.९० लाखांची चोरी
गजानन तिडके
देऊळगाव राजा : देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथे अज्ञात चोरट्यांनी कृषी साहित्याच्या दुकानाचे लोखंडी शटर उघडून तब्बल १ लाख ९० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना रविवारी मध्यरात्रीनंतर उघडकीस आली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विजय नामदेव शिंगणे (वय ५७, रा. देऊळगाव मही) हे गावात जिजाऊ अॅग्रो एजन्सी अँड इलेक्ट्रिक या नावाने कृषी साहित्याचे दुकान चालवितात. दि. २६ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजता दुकान बंद करून ते घरी गेले होते. त्यानंतर दि. २७ जुलै रोजी सकाळी पाच वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या लोखंडी शटरचे नट-बोल्ट उघडून आत प्रवेश केला.
दुकानातील गल्ल्याजवळ ठेवलेल्या सामानाच्या खोक्यातील पिशवीत १ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम ठेवलेली होती. ही रक्कम फिर्यादी यांनी त्यांच्या भावाकडून उसनवारीने घेतल्याचे सांगितले आहे. याशिवाय दुकानातील सुमारे ४० हजार रुपये रोख रक्कमही चोरट्यांनी लंपास केली. अशा प्रकारे एकूण १ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला.
घटनेची माहिती मिळताच देऊळगाव राजा पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मोहोळकर यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. फिर्यादी विजय शिंगणे यांच्या तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ व ३३४(१) अंतर्गत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मोहोळकर करीत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संशयितांच्या हालचाली तसेच तांत्रिक पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे.
दरम्यान, देऊळगाव मही परिसरात अलिकडच्या काळात चोरीच्या घटना वाढत असल्याने व्यापारी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या गस्तीत वाढ करून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

