Mahabreaking

[breaking_news]

two arrested :एका लाखांच्या बदल्यात १० लाखांचे आमिष; दोघांना अटक, सहा फरार

two arrested : कमी रकमेच्या बदल्यात जास्त रकमेच्या नोटा देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून, या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून रोख रक्कम, ‘चिल्ड्रेन बँक’च्या बनावट नोटा, चार मोबाईल, एक चाकू आणि मोटारसायकल असा एकूण ₹२ लाख ४५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 two arrested

 बनावट नोटांच्या आमिषाने नागरिकांची फसवणूक; स्थागुशाची धडक कारवाई, ₹२.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त

गजानन तिडके 

बुलढाणा : कमी रकमेच्या बदल्यात जास्त रकमेच्या नोटा देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून, या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून रोख रक्कम, ‘चिल्ड्रेन बँक’च्या बनावट नोटा, चार मोबाईल, एक चाकू आणि मोटारसायकल असा एकूण ₹२ लाख ४५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून काही समाजकंटकांकडून नागरिकांना ₹१ लाखांच्या बदल्यात ₹१० लाखांच्या नोटा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या घटना समोर येत होत्या. या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी अशा टोळ्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.

त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक आशिष रोही यांनी स्वतंत्र पथके तयार करून तपास सुरू केला. दरम्यान, दि. २६ जुलै २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की, सुभाष माणिकराव गावंडे (रा. हिवरखेड, ता. तेल्हारा, जि. अकोला) यांना मलकापूर शहर परिसरात काही इसम जास्त रकमेच्या नोटांचे आमिष दाखवून फसवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मलकापूर शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील कुंड परिसरात सापळा रचला. कारवाईदरम्यान अभिषेक भिमराव इंगळे (वय २०) आणि मयूर सुनील खानझोडे (वय १९, दोघेही रा. कुन्हा (काकोडा), ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) यांना ताब्यात घेण्यात आले.

आरोपींकडून ₹५ हजारांची रोख रक्कम, दर्शनी किंमत ₹१० लाख असलेल्या ‘चिल्ड्रेन बँक’च्या नोटा, एक चाकू, चार मोबाईल फोन आणि स्प्लेंडर प्लस मोटारसायकल असा एकूण ₹२.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी फिर्यादी सुभाष गावंडे यांच्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५५३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१०(२) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईदरम्यान या गुन्ह्यातील अन्य सहा आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असून, त्यांचा शोध स्थानिक गुन्हे शाखा आणि मलकापूर शहर पोलीस संयुक्तपणे घेत आहेत. पुढील तपास मलकापूर शहर पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक पियूष जगताप आणि अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष रोही यांच्या नेतृत्वात पोउपनि. अविनाश जायभाये, प्रशांत डगवार, एएसआय राजेंद्र अंभोरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

नागरिकांना आवाहन : पोलीस प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अवास्तव आर्थिक आमिषांना बळी न पडण्याचे तसेच अशा संशयास्पद व्यक्ती किंवा व्यवहारांची तातडीने पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top