Light drizzle returns : तब्बल तीन आठवड्यांच्या मोठ्या खंडानंतर साखरखेर्डा परिसरात पुन्हा सर्वदूर रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतातील पिके बहरली असून शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, पिण्याच्या पाण्याची टंचाई अद्यापही कायम असल्याने नागरिकांची चिंता कमी झालेली नाही.

साखरखेर्डा: तब्बल तीन आठवड्यांच्या मोठ्या खंडानंतर साखरखेर्डा परिसरात पुन्हा सर्वदूर रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतातील पिके बहरली असून शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, पिण्याच्या पाण्याची टंचाई अद्यापही कायम असल्याने नागरिकांची चिंता कमी झालेली नाही.

या पावसामुळे मूग, उडीद, सोयाबीन, तूर, कापूस, तीळ, मका आदी खरीप पिकांना मोठा फायदा झाला आहे. दीर्घ उघडीपीनंतर झालेल्या पावसामुळे पिकांना नवजीवन मिळाले असून सध्या तरी एल निनोचा संभाव्य परिणाम टळल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे.
यंदा मान्सूनच्या उशिरा आगमनामुळे खरीप पिकांची पेरणी उशिराने झाली. त्यानंतर काही भागात कमी, तर काही भागात अतिवृष्टी झाल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतर पिके उगवून जमिनीवर आल्यानंतर शेतकऱ्यांनी खतांचा वापर, तणनाशकांची फवारणी, निंदण-खुरपणी तसेच कोळपणीची कामे पूर्ण केली. मात्र, पिके जोम धरू लागली असतानाच पावसाने पुन्हा दडी मारल्याने शेतकरी आकाशाकडे आशेने डोळे लावून बसले होते.
मोठ्या उघडीपीसह कडक उन्हामुळे कोवळी पिके करपू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, या काळात शेतकऱ्यांनी उघडीपीचा योग्य उपयोग करून निंदण, खुरपणी, कोळपणी, कापूस पिकातील वखरणी तसेच तणनाशक व कीडनाशकांची फवारणी करून पिके तणमुक्त व कीडमुक्त ठेवण्याचा प्रयत्न केला.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे आता शेतातील पिके चांगली बहरली असून परिसर हिरवागार झाला आहे. सर्वत्र हिरवाईची चादर पसरल्याचे मनोहारी चित्र दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत असून ते पुढील शेतीच्या कामात पुन्हा जोमाने व्यस्त झाले आहेत.

